Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटीच्या आराखड्याला मान्यता

Nashik News : णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटीच्या आराखड्याला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

णमोकार तीर्थ (Namokar Tirtha) येथे ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनासाठी १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. णमोकार तीर्थच्या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी. कोणत्याही कामात तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. संबंधित यंत्रणांनी सर्व सोयीसुविधा भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.

YouTube video player

णमोकार तीर्थला भेट देण्यासाठी देश-विदेशातून भाविक येणार असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा, अशी सूचना फडणवीस यांनी दिली.

या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून १० ते १५ लाख भाविक येतील. हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Aayush Prasad) यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचि मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.

णमोकार तीर्थ विकास आराखडा

णमोकार तीर्थ हे जैन धर्मस्थळ असून नाशिक-धुळे महामार्गावर मौजे मालसाणे गावाजवळ ४० एकरावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, ४५० युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...