नाशिक | Nashik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे (Akhil Bhartiya Mahanubhav Parishad) ३८ वे अधिवेशन नाशिकच्या जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे पार पडला. दि.२४ व २५ नोव्हेंबर असे दोन हे अधिवेशन चालणार असून, आज या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थित साधू-महंत, तपस्वींना संबोधित केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज मला अतिशय आनंद आहे की ३८ व्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात सहभागी होऊ शकलो. खर म्हणजे एक महिन्यापूर्वीच हे अधिवेशन होणार होते. त्याच्यासाठी महंत करंजेकरबाबांनी माझा वेळही घेतला होता. पंरतु, काही कारणांमुळे मला येणे शक्य नव्हते. मी बाबांना सांगितलं आपल्या परिषदेचे अधिवेशन आहे ते आपण अधिवेशन संपन्न करून घ्या,मी पुढच्या कुठल्यातरी कार्यक्रमात येईल. पण करंजेकरबाबांनी आणि इतर मंडळींनी मला तुम्ही आले नाहीतर आम्ही अधिवेशनच घेणार नाही, असे सांगत एकप्रकारे धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आधी माझी अधिवेशनाची तारीख घेतली आणि आज मला या संत-महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येता आले, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, मला करंजेकर बाबा जे काही म्हणतात ते सगळ मान्य असतं. पण मगाशी ते एक गोष्ट म्हणाले ती मला पूर्णपणे मान्य नाही. ते असं म्हणाले आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले, मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला. आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलंय, पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो, मला पंथाच्या सर्व प्रथा, पंरपरा माहिती आहे. त्यामुळे मी काही महानुभाव पंथाच्या बाहेरचा नाही, असेही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, ज्या-ज्यावेळी धर्मावर ग्लानी येईल, समाजावर आपत्ती येईल, जाती-जातीत भेद निर्माण होईल, ज्यावेळी समाज धर्माच्या मार्गावरून पतभ्रष्ट होईल, त्या-त्यावेळी वेगेवेगळ्या रूपाने मीच जन्म घेईल आणि त्याठिकाणी संपूर्ण समाजाला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे त्यावेळी समाज हा आपल्याला पतभ्रष्ट झालेला पाहायला मिळतो. सातत्याच्या आक्रमणामुळे आणि भेदाभेदामुळे समाजातील विषमतेमुळे एकप्रकारची वेगळी व्यवस्था आपल्या बघायला मिळते. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधण्याचे काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केले आणि जो समाज जात, पंथ,भाषेत उच नीच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दर्यामध्ये विभागला होता त्या संपूर्ण समाजाला महानुभाव पंथाच्या विचाराने एकत्रित केले, असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच गुजरातमधून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्राच्या मातीत आले.त्यांनी मराठी भाषेची जी सेवा केली ती कोणीच केलेली नाही. आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यासाठी जे दोन ग्रंथ महत्त्वाचे पुरावे ठरले. त्यातील एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि दुसरा ग्रंथ लीळाचरित्र हा आहे. एक प्रचंड मोठे साहित्यपीठ निर्माण करून एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रेरणेने झाली नसती तर आज कदाचित इतकी समृद्ध अश्या प्रकारची आपली भाषा, त्यातले विचार, त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणीवा आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या. केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावर त्यांचा उपकार नाही तर मराठी भाषेला मराठी भाषा म्हणून रुजविण्याचे काम हे देखील महानुभाव पंथाच्या साहित्यातून तयार झालेले आहे हे खऱ्या अर्थाने मान्य करावे लागेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाबाबत काय म्हणाले?
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सर्व सरकारी कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाला काहींनी विरोध दर्शविला आहे. यामध्ये काही वाद निर्माण झाले आहेत. अवतरण दिवस म्हणजे ईश्वराचा अवतार आहे. मग तो तुम्ही कसा साजरा करता. महापुरुषांबाबत तुम्ही असे कसे करता असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही चक्रधर स्वामींना मानतो म्हणून अवतरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो करायचा की नाही हे पंथाने ठरवावे. यावर आम्ही एक कमिटी तयार केली आहे. कमिटी जे सांगेल ते आम्ही करु,कमिटी म्हणाली करा तर आम्ही शंभर टक्के चक्रधर स्वामींचा अवतरण दिवस साजरा करु. आणि कमिटी नको म्हणाली तरी आम्ही मनातल्या मनात चक्रधर स्वामींचा अवतरण दिन साजरा करू,असेही त्यांनी स्पष्ट केले.





