नाशिक | Nashik
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik City) सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अनेक कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, ती आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त व सिंहस्थ मेळा संयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी दिली.
सिंहस्थ मेळा (Simhastha Mela) अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला असताना, अनेक विकासकामांना अद्याप प्रारंभ न झाल्याबद्दल विविध स्तरांवरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गेडाम यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात सर्वच प्रमुख रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विकासकामांमध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या फेज-१ प्रकल्पाचा शुभारंभ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आठ रस्ते प्रकल्प (२,२७० कोटी), मनपाचे ९०० कोटींचे रस्ते काम, सहा ते आठ पूलांच्या बांधकामांची सुरुवात, मुकणे आणि बेझे धरणातून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, १,५०० कोटींच्या एसटीपी विकास प्रकल्पाचा प्रारंभ तसेच रामकुंड परिसर, सीसीटीव्ही व्यवस्था आणि पुरा-तत्त्व मंदिर विकास प्रकल्प या सर्व कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी एकत्रित सुमारे ६,००० कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
डिसेंबरपर्यंत आणखी ३,००० कोटींची कामे
डिसेंबरपर्यंत आणखी ३,००० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती देताना डॉ. गेडाम म्हणाले की, यात रिंग रोडचे भूसंपादन, पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते सुधारणा, तसेच द्वारका सिग्नलवरील अंडरपास या कामांचा समावेश असेल. त्यासोबतच त्र्यंबकेश्वर दर्शन पथ, अतिरिक्त घाट बांधणी, आणि जलसंपदा विभागाच्या काही प्रलंबित प्रकल्पांचाही समावेश या टप्प्यात होणार आहे.
साधूग्रामसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया वेगात
सिंहस्थ मेळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला साधूग्राम प्रकल्प सध्या जागेअभावी अडचणीत आहे. साधूग्रामसाठी लागणारी सुमारे १,१०० एकर जमीन उपलब्ध करण्यासाठी आरक्षित ठेवलेली ३७५ एकर जागा खरेदी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. उर्वरित जमीन भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
मुकणे व बेझे धरणांचा उपयोग
शहराला लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या गरजांसाठी मुकणे धरणातून नाशिकसाठी, तर बेझे धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धार्मिक कामांसाठी पाणी आरक्षण करता यावे यासाठी शासनाने अधिसूचना जारी केली असून, त्यानुसार नियोजन केले जाईल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
रेल्वे व बस सेवांसाठी नव्या सुविधा
सिंहस्थ मेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक रेल्वेने नाशिकमध्ये येणार असल्याने, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबेसुकेणे या स्थानकांवर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, बस व्यवस्थेचे नियोजन, नागरिकांसाठी होल्डिंग एरिया, आणि वाहतूक नियंत्रणाची तयारी सुरू आहे.
ठेकेदाराची लेखी हमी आवश्यक
द्वारका सर्कलवरील अंडरपासचे काम सिंहस्थपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण करण्याची लेखी हमी दिल्यानंतरच या कामाला मंजुरी दिली जाईल, असे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले.
४.५ किमीचा पायी मार्ग
मागील सिंहस्थ मेळ्यात भाविकांना गर्दीमुळे हालचाल करणे कठीण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या वेळी पायी चालणाऱ्यांसाठी दीड ते साडेचार किलोमीटरचा सुलभ मार्ग उपलब्ध केला जाणार आहे. यामुळे भाविकांना सहज दर्शन घेता येईल आणि शहरातील वाहतूकही सुरळीत राहील, असेही प्रविण गेडाम यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या शुभारंभ कार्यक्रमातून नाशिकच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार असून, आगामी सिंहस्थ मेळ्यासाठी शहर सज्जतेच्या दिशेने पुढे जात असल्याचे त्यातून सिध्द होणार आहे.




