चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी णमोकार तीर्थाला (Namokar Tirtha) भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराजांचे दर्शन घेतले आणि णमोकार तीर्थाचे भव्यतेचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच दोन वर्षांनंतर हे भाग्य लाभले, तीर्थक्षेत्राची ऊर्जा आणि अध्यात्मिक वातावरण विलक्षण आहे, असेही शर्मा यांनी म्हटले. या भेटीचा मुख्य उद्देश फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या भव्य पंचकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाची तयारी सुनिश्चित करणे हा होता.
यावेळी आयोजित सत्कार समारंभात बोलताना जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, “पंचकल्याणक महोत्सवासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, सुरक्षा, अग्निशामक व्यवस्था, वाहतूक व निवास व्यवस्था यांसारख्या स्थायी व अस्थायी सुविधांची आखणी करून लवकरच मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच प्रशासन या महत्त्वाच्या धार्मिक महोत्सवासाठी पूर्ण मदतीसाठी कटिबद्ध आहे. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील,” असेही त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाची सुरुवात बालब्रह्मचारी वैशाली दिदी (Vaishali Didi) यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आचार्य श्री देवनंदीजी महाराज व णमोकार तीर्थाचे अध्यात्मिक महत्त्व विशद केले.यानंतर राष्ट्रसंतांचे प्रवचन पार पडले. ग्लोबल महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस लोहाडे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून पंचकल्याणक महोत्सवाची संपूर्ण रूपरेषा उपस्थितांना सादर केली. कार्यक्रमात मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, णमोकार तीर्थ ट्रस्टचे भूषण कासलीवाल,ट्रस्टी पवन पाटणी, विजय लोहाडे, डॉ. अतुल जैन, वर्धमान पांडे, पुनम संचेती, सोनल दगडे, अंकित संचेती यांची भाषणे झाली.
दरम्यान, या प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी तसेच जैन समाजातील बंधू-भगिनी व चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचकल्याणक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन आणि समाज दोघेही एकवटले असून, हा महोत्सव धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ऐतिहासिक ठरणार आहे.




