नाशिक | प्रतिनिधी
काँग्रेस नेते माजी खा.हुसैन दलवाई आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या नियोजनाप्रमाणे दुपारी ते द्वारका भागातील हजरत सातपीर दर्गा येथे ज्या ठिकाणी मनपाने कारवाई केली, त्या ठिकाणी जात असतांना पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. नंतर काही वेळेत त्यांना सोडण्यात आले. मात्र मी पुन्हा येथे येणार अशी घोषणा त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
आज (दि.22) दलवाई सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिकला आले. यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी काठे गल्ली, सातपीर दर्गाबाबत माहिती घेतली, तर दुपारी पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली.
यावेळी त्यांनी निर्दोश लोकांवर पोलिसांनी कारवाई करू नये, त्याच प्रमाणे ज्यांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, त्यांना कडक शासन करण्याची मागणी केली. यानंतर दलवाई व त्यांच्या समवेत काही कार्यकर्ते सातपीर बाबा येथील घटनास्थळी भेट देण्यासाठी पखालरोड उस्मानिया चौकात दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले, मात्र ते तेथे जाण्यावर ठाम राहिल्याने त्यांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नंतर सुमारे दोन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हाजी तन्वीर तांबोळी, फारुक मंसुरी आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा