Friday, May 3, 2024
Homeनाशिकआनंदाची बातमी : मालेगावमधील चार तर नाशिक शहरातील एक रुग्ण करोनामुक्त; २७...

आनंदाची बातमी : मालेगावमधील चार तर नाशिक शहरातील एक रुग्ण करोनामुक्त; २७ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज

मालेगाव | प्रतिनिधी 

रमजानच्या पवित्र पर्वात नाशिक आणि मालेगावमधून आनंदाची बातमी आली आहे. आज मालेगावमधून चार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. नाशिकरोड येथील करोना बाधित पोलीस अधिकाऱ्याचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

यासोबतच आनंदवल्ली येथील कोरोना बाधित रुग्णाचे दोन्ही अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने, त्या रुग्णासही डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मालेगावमधील एकूण २७ करोनामुक्त होणार असून त्यांच्याही डिस्चार्जची तयारी सुरु असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

आज मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातून चार करोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून आज चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांसह प्रशासनामध्ये सकारात्मक वातावरण निर्मीती झाली असून अक्षयतृतीया व रमजानच्या पवित्र पर्वात मालेगावतील रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत ही आरोग्य प्रशासनासह मालेगावच्या नागरिकांसाठी आनंदाचा क्षण आहे.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी भुसे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) डॉ.आरंती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार, यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

करोना विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीचे नमुने देखील निगेटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षात घेता शहरातील नागरिकांनी पुढे येवून तात्काळ उपचार करुन घ्यावेत. या ठिकाणी शासनामार्फत मोफत उपचार केले जातात. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वत:वर उपचार करुन घ्या, स्वत:चे प्राण वाचवा आणि कोरोना विषाणूचा आपण सर्व मिळून पराभव करु या. असे आवाहन या निमीत्ताने मंत्री भुसे यांनी केले आहे.

आतापर्यंत मालेगावातून कोरोना बाधीत रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या बातम्या येत होत्या. परंतु काल देखील 27 अहवाल निगेटिव्ह आले असून आजही जवळपास 450 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यापैकी बहूसंख्य अहवाल हे मालेगाव शहरातील व परिसरातीलच आहेत. काल 3 तर आज 4 असे 7 रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ही अत्यंत चांगली बातमी असून अजून जवळपास 17 रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने जवळपास 27 रुग्ण हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात अजून काही रुग्णांची घरवापसी होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी मांढरे यांनी आज दिले.

आज मालेगावमधून करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील मोमीनपुरा परिसरातील 53 वर्षीय पुरुष, महेबीनगर परिसरातील 27 वर्षीय तरुण, कमालपूरा परिसरातील 46 वर्षीय पुरुष तर नयापुरा परिसरातील 50 वर्षीय महिलेचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या