नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराजांची (Sant Nivruttinath Maharaj) आज (दि.२५) रोजी यात्रा असल्याने त्र्यंबकमध्ये दिवसभर वारकऱ्यांसह यात्रेकरूंची मांदियाळी पाहायला मिळाली. पहाटे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. यावेळी निवृत्तिनाथांच्या समाधीला दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मंदिराचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
शासकीय महापूजा पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी वारकरी यात्रेकरूंसह त्र्यंबकच्या आसपासच्या गावातील नागरिकांनीही यात्रेला हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर त्र्यंबकमध्ये मोठी गर्दी असल्याने यात्रोत्सवानिमित्त त्र्यंबकनगरी दुमदुमल्याचे पाहायला मिळाले. अंदाजे दोन ते अडीच लाख भाविकांनी या यात्रेसाठी हजेरी लावल्याचे समजते. यावेळी यात्रेकरूंनी लहान मुलांसोबत त्र्यंबकराज मंदिरासह (Trimbakeshwar Temple) संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत रहाट पाळणे आणि सर्कस बघण्याचा आंनद लुटला.
तसेच दुपारी चार वाजेच्या सुमारास संत निवृत्तिनाथांच्या चांदीच्या रथात सजविलेल्या पालखीत नाथांची चांदीची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी निवृत्तिनाथांच्या नामाचा एकच जयघोष केला. हा रथ तेली गल्ली, पाटील गल्ली याठीकाणाहून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे आणण्यात आला. यावेळी रथ पालखी मंदिराच्या जवळ येताच देवस्थानच्या विश्वस्तांनी पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर रथ मेनरोडने निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात परतून नेण्यात आला.
दरम्यान, यावेळी भाविकांसह (Devotees) यात्रेकरूंची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून नाशिक सिटी लिंक बस आणि राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तसेच काही यात्रेकरू त्र्यंबकहून वाहने घेऊन परतत असताना नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तर त्र्यंबकमध्ये जागोजागी बाहेरील दुकानदारांनी दुकाने थाटली होती, त्यामुळे यात्रेकरूंची साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.