नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सारडा सर्कल ते द्वारका (Sarda Cirucle to Dwarka) या रस्त्यावर ‘ग्रेड सेप्रेटर’च्या निर्मितीला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होत असून त्यासंदर्भातील सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहेत. त्यातून शहरातील अंतर्गत आणि अवडजड वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविली जाणार असल्याने खोळंबा वाढण्याची चिन्हे असून लवकरच शहर वाहतूक विभागाकडून वाहतूक मार्ग बदलांची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
शहरात (City) पूर्वीच २५ ठिकाणी रस्त्यांची तोडफोड सुरु आहे. सिंहस्थापूर्वी द्वारका सिमल येथे ‘ग्रेड सेप्रेटर’ची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सन २०२५ मध्येच घोषणा करण्यात आली होती. तर मंत्रालयामार्फत २१४ कोटी मंजुरीचीही घोषणा झाली. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी कंत्राटाबाबतची प्रक्रिया सुरू केली असून, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत निर्मितीसंदर्भातील अंतिम नियोजन पूर्ण होणार आहे.
त्या अनुषंगाने येथील वाहतूक मागांत बदल करण्यापूर्वी अंतिम सर्वेक्षण करण्याचेआदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ एक च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ दोनचे किशोर काळे, गुन्हे व विशेष शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वाहतुक विभागाचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप मिटके आणि सहायक आयुक्त अद्विता शिंदे यांना दिले होते. त्यानुसार, सातही पथकांनी सर्वेक्षण पूर्ण केले असून अहवाल तयार केला जात आहे. तो तयार होताच पोलीस आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी त्यात काही सूचना व फेरबदल सुचविल्यानंतर अंतिम अहवाल तयार करुन मंजूरीनंतर आवश्यक कार्यवाही अमलात आणली जाणार आहे.
रॅम्प उभारणीला वेग
राणेनगर येथे ‘रॅम्प’ उभारणीचे काम सुरु असून, इंदिरानगर येथील एका बाजूच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ‘रॅम्प’ उभारणी पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी काम सुरु केले आहे. इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बोगद्याच्या रुंदीकरणासह तेथे दोन लहान स्वरुपात पूल उभारण्यात येत आहेत. बोगदा रुंद झाल्यानंतर त्यावर पूल उभारला जाईल. त्यामुळे ज्यांना थेट मुंबई नाका व पाथर्डी फाट्याच्या दिशेने जायचे आहे, ते पूलावरुन जाऊ शकतील. या निर्णयामुळे कोंडी फुटण्याची शक्यता असून, कामकाज पूर्ण होईपर्यंत मात्र नाशिककरांना कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पोलिसांच्या सर्वेक्षणातून
- द्वारका, सारडा सर्कल, आडगाव नाका, अशोका मार्ग, वडाळा नाका, काठेगल्ली येथून वाहतूक वळविणार
- महत्त्वाचे सर्कल, चौक, सिग्नलजवळील वाहनांची स्थिती, गर्दीची वेळ आणि पर्यायी मार्गावर अतिरिक्त वाहतूक अंमलदार
- दुहेरी मार्गावरील अवजड वाहनांसाठी स्वतंत्र रस्त्याचे नियोजन
- दुचाकीसाठी स्वतंत्र तसेच रिक्षा व चारचाकी वाहनांसाठीही स्वतंत्र मार्ग
- इंदिरानगर, राणेनगर बोगद्याजवळील दुरुस्ती विचारात घेता उर्वरित मार्गात बदलांची शक्यता




