Monday, June 17, 2024
Homeनाशिकबाणगंगेला पाणी सोडल्याने आठ गावांची तहान भागली

बाणगंगेला पाणी सोडल्याने आठ गावांची तहान भागली

कसबे सुकेणे | वार्ताहर

- Advertisement -

ऐन मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये बाणगंगा नदीला गंगापूर कालव्याचे पाणी नदीपात्रात सोडल्याने व नदीपात्रात पाणी आल्याने बाणगंगा नदी खळखळ वाहू लागली आहे. या पाण्यामुळे कसबे सुकेणेसह नदीकाठच्या आठ गावांची तहान भागली आहे…

यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातारण आहे.

यंदा उन्हाळा गंभीर स्वरूप धारण करत असून, काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ पाहत होता. मात्र, गंगापूर कालव्याचे वर्षाच्या अखेरचे शेवटचे सिंचन सुरू असताना ओझरजवळ नदीपात्रात कालव्याचे पाणी सोडल्याने बाणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ओझर ते कसबे सुकेणे दरम्यानचे सर्व बंधारे भरून वाहू लागले आहेत.

याशिवाय कसबे सुकेणे येथील बाणगंगा नदी पुलाजवळील बंधाऱ्याचे काम मोठ्या प्रमाणात दुरुस्त केले होते. येथीलच कुबेर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने मागील वर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीपात्राची चाळणी केली होती.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी मुरल्याने कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या गावांच्या विहिरींना पाण्याची पातळी वाढली होती. मात्र मागील वर्षाच्या पुरामुळे येथील मुख्य बंधारा पुन्हा गाळाने भरला असून हा बंधारा लिक झाल्याने बंधाऱ्यातील पाणी निघून जाते. त्यामुळे या बंधाऱ्याची गळती काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

मात्र बाणगंगा नदीला ऐन उन्हाळ्यात पाणी आल्याने बाणगंगा नदीकाठावरील दिक्षी, शिलेदारवाडी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे व कसबे सुकेणे या गावांचा तूर्त तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नदीकाठावरील आठही गावांच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नाने गंगापूर कालव्याचे पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये पाटबंधारे विभागाने सोडल्याने आता चालू वर्षी तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही मात्र मौजे सुकेणे व कसबे सुकेणेसाठी आवश्यक असलेला बाणागंगा पुलानजीकचा बंधारा गाळाने भरला आहे शिवाय हा बंधारा लीक आहे त्यामुळे या बंधाऱ्यातील गाळ उपसा करून लिक काढावे म्हणजे पाणी साठवण क्षमता वाढेल

राजेंद्र मोगल माजी जि.प सभापती नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या