पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक बाजार समितीचे (Nashik Agricultural Produce Market Committee) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingale) यांच्याविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव आज (दि.११) रोजी झालेल्या विशेष सभेत १५ संचालकांच्या समर्थनाने मंजूर करण्यात आला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पिंगळे यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर आता १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीत नव्या सभापतीची निवड होणार आहे. तोपर्यंत उपसभापती विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्याकडे ३ मार्च रोजी अविश्वास ठराव (Motion of No Confidence) दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज (दि.११) रोजी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेसाठी १८ पैकी १५ संचालक उपस्थित होते, तर देविदास पिंगळे, नलिनी कड आणि उत्तम खांडबहाले हे गैरहजर होते.
मतदानावेळी (Voting) शिवाजी चुंभळे, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, युवराज कोठुळे, प्रल्हाद काकड, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुंभळे, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे आणि संदीप पाटील या १५ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी ठराव मंजूर केला. ठरावाची प्रत जिल्हाधिकारी आणि उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे.
सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू
पिंगळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने नाशिक बाजार समितीच्या नव्या नेतृत्वाची निवड १९ मार्चला होणार आहे. यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर शिवाजी चुंभळे तर दुसऱ्या क्रमांकावर संपत सकाळे यांचे नाव पुढे येत आहे.
अविश्वास ठरावामागील पार्श्वभूमी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संचालक परदेशवारीला जाण्याच्या तयारीत होते, परंतु काहींचे पासपोर्ट नसल्याने त्यांना महाराष्ट्रातच भ्रमंती करावी लागली. मात्र, अविश्वास ठरावाच्या बैठकीत हे सर्व संचालक सभागृहात दाखल झाले आणि ठरावाच्या बाजूने मतदान केले.
सभापती निवडीचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेतला जाईल. प्रत्येक संचालकाचा पुढील कामकाजात महत्त्वाचा सहभाग राहील. बाजार समिती आणि उपबाजारांच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील.
शिवाजी चुंभळे, माजी सभापती, नाशिक बाजार समिती
माझ्या नावावर निवडून आलेले संचालक केवळ पैशासाठी दुसऱ्या गटात गेले आहेत. गद्दारी करणाऱ्यांकडून बाजार समितीच्या विकासासाठी काहीही होणार नाही. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.
देविदास पिंगळे, माजी खासदार आणि माजी सभापती, नाशिक बाजार समिती
पिंगळे यांनी आत्मपरीक्षण करावे की १५ संचालकांनी त्यांची साथ का सोडली? बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वानुमते शिवाजी चुंभळे यांना पाठिंबा दिला आहे. २२ कोटी रुपये खर्चून नवे कार्यालय बांधण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृह आणि पार्किंगच्या समस्या सोडविण्यावर आमचा भर असेल. येणाऱ्या विद्यमान सभापतींनी मनमानी कारभार केला तर त्यांना पण सोडण्याची तयारी आमची आहे.
विनायक माळेकर, हंगामी सभापती, नाशिक बाजार समिती