नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासनाने अंगणवाडी केंद्रांना (Anganwadi Centers) वीजजोडणी (Electricity Connection) देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत स्वमालकीच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना विद्युत जोडणी करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात आली, या मोहिमेंतर्गत एका महिन्यात बिद्युत जोडणी नसलेल्या ३ हजार ३० अंगणवाडी केंद्रांपैकी आतापर्यंत २ हजार २८८ अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी करण्यात आली आहे.
केंद्र पुरस्कृत अंगणवाडीचे सक्षम अंगणवाडीत अद्ययावतीकरण योजनेंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना सोयीसुविधा देण्याकरीता विद्युत जोडणी करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) महिला बालकल्याण विभागांतर्गत जिल्हाभरात ५ हजार ११५ अंगणवाडी केंद्रे चालविली जातात. त्यातील ४ हजार २५६ अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत सुरू असून, त्यातील ४०३ अंगणवाडी केंद्रांना बीज सुविधा उपलब्ध आहे, तर ६६८ अंगणवाड्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज प्राप्त झालेली आहे.१४ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील (District) सर्व गट विकास अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेतली असता स्वमालकीच्या ४२९० अंगणवाडी केंद्रांपैकी ३०३० अंगणवाडी केंद्रांना विद्युत जोडणी नसल्याचे निदर्शनास आल्याने स्वमालकीच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना तात्काळ विद्युत जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार गट स्तरावर गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व उप अभियंता महापारेषण यांच्या संयुक्त प्रयत्नाने ३०३० पैकी २,२८८ अंगणवाडी केंद्रांना बीज पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. उर्वरीत अंगणवाडी केंद्रांची विद्युत जोडणी २६ जानेवारी २०२५ पुर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यंत्रणेला दिलेले आहेत. त्यानुसार अंगणवाडी केंद्रांना बीजजोडणी करण्याचे काम सुरू असून दररोज बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येत असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.
डिजिटल शिक्षणासाठी मदत होणार
महिनाभरातच स्वमालकीच्या २२८८ अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी करण्यात आली आहे. सर्व अंगणवाडी मध्ये विद्युत पुरवठा असल्यास ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना डिजिटल माध्यमातून पूर्व शालेय शिक्षण देवून त्यांचा सर्वांगीण विकास कराव्यास मदत होणार आहे. तसेच अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध करून दिलेनंतर अंगणवाडी केंद्रांत पोषण वाटिका, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आर. ओ. युनिट, एलईडी टीव्ही उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या धोरणास मदत होणार आहे. २६ जानेवारीपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश दिले असून त्याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक