नाशिक | Nashik
सध्या कांद्याच्या (Onion) दरात मोठी घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात सापडला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या या आक्रमकतेचा फटका नुकतेच मंत्री झालेल्या नितेश राणे (Nitesh Rane) यांना बसला आहे. मंत्री राणे हे काल नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी राणे हे उपस्थितांना संबोधित करत असताना एका शेतकऱ्याने त्यांना कांद्याची माळ घातल्याचा प्रकार घडला.
सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) चिराई गावात फिरत्या नारळाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राणे यांनी हजेरी लावली असता त्यावेळी एका तरुण शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. मात्र यावेळी व्यासपीठावर उपस्थित पोलिसांनी (Police) कांदा उत्पादक शेतकऱ्याला ताब्यात घेतले असता त्यांच्या समस्या ऐकून घेऊ असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या शेतकऱ्याचे नाव समजू शकलेले नाही.
दरम्यान, या शेतकऱ्याने कांद्याची माळ मंत्र्यांना घालून त्याने कांदा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याकडे राज्यातील आणि केंद्रातील सरकारचे (Central Government) लक्ष वेधले असून त्यात तो चांगलाच यशस्वी झाला आहे. तर दुसरीकडे एरव्ही आक्रमक आणि धार्मिक ध्रुवीकरणाची विधाने करणारे मंत्री राणे यावेळी मात्र स्वतःच स्तब्ध झाल्याचे दिसून आले.