नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मखमलाबाद रोड (Makhamalabad Road) येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यातील कलहामुळे त्यांची दीड वर्षीय बालिका वडिलांकडेच (Father) रहावयास असताना तिचा खेळताखेळता घराजवळील विहिरीत बुडून मृत्यू (Death) झाला. यानंतर, वडिलांनी घटनेची वाच्यता न करता तिचा मृतदेह मखमलाबाद गावातील स्मशानभूमीत पूरुन टाकत अंत्यसंस्कार केले. दरम्यान, बालिकेचा तिच्या वडिलांनी घातपात केल्याचा आरोप आईने केला. मात्र, सखोल तपासात बालिकेचा (Girl) नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
वैष्णवी विकास वळवी (वय दीड वर्ष, रा. पाण्याच्या टाकीजवळ, प्रोफेसर कॉलनी, मखमलाबाद रोड) असे मृत बालिकेचे नाव आहे. वैष्णवीची आई विद्या व वडील विकास यांचा विवाह सन २०२१ मध्ये झाला आहे. त्यांना दीड वर्षांची वैष्णवी ही मुलगी होती. विवाह झाल्यानंतर विद्या व विकास यांचे कौटुंबिक वाद सुरु झाले. त्यामुळे प्रकरण थेट गंगापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे विद्याने पती व इतरांविरोधात पैशांची मागणी व छळवणूकीची तक्रार नोंदविली. त्यामुळे पती-पत्नी (Husband and Wife) विभक्त राहू लागले. त्यातच दीड वर्षीय वैष्णवी वडिल विकास यांच्या ताब्यात होती. त्यातच, दोन दिवसांपूर्वी ती घराजवळ खेळत होती. त्यानंतर शेजारील विहिरीत पडून ती मृत पावली.
काही वेळाने घटना लक्षात येताच, विकासने तिला पाण्याने भरलेल्या विहिरीतून बाहेर काढत तिच्यावर स्मशानभूमीत पुरुन अंत्यसंस्कार केले. या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्याला कळाली. त्यांनी थेट डायल ११२ ला फोन करुन माहिती दिली. त्यानंतर, झोन एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kiran Kumar Chavan) म्हसरुळचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व नातलग स्मशानभूमीत पोहोचले. जेथे वैष्णवीला पुरण्यात आले, त्या ठिकाणाहून तिचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला.
दरम्यान, सखोल तपासात पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून आज (दि. १३) शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यामुळे अहवालात काय अभिप्राय येतो, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत म्हसरुळ पोलिसांत (Mhasrul Police) आकस्मिक मृत्त्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणात कुठलाही घातपात समोर आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तरी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार सखोल तपास सुरु आहे.