नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फूलशेतीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये (Nashik) गेल्या आठवडाभरापासून पावसाने (Rain) जोर पकडला होता. रविवारी एकाच दिवसात ७६.६ मि.मी. इतका विक्रमी पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे फूलशेतीचे (Flower Farm) प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दसरा, दिवाळीत झेंडू, शेवंती, मोगरा, गुलाब या फुलांची आवक किमान ४० टक्के घटून भाव वाढणार असल्याची शक्यता फुलशेती करणारे शेतकरी तसेच फूलविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दसरा, दिवाळीच्या अगोदर जिल्ह्यात (District) ५०० एकरांवर झेंडूची शेती बहरात येणार होती; परंतु पावसामुळे केवळ ३०० एकरांवरील फुले हातात येतील. त्यातही फुलांचा आकार घटलेला असेल, असे फुल उत्पादकांनी सांगितले. अगोदरच महागाईचा चटका सहन करणाऱ्या फूलबाजारात दुहेरी संकट ठाकले आहे. जळगावसह मुंबई, बडोदा येथील बाजारपेठांना नाशिकची (Nashik) फुले सुगंध देतात. मात्र ही आवक आता घटणार आहे.
पॉलिमरची फूलशेती वाचली
पावसाचा फटका पॉलिमस्खाली फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला नाही. ज्यांची फूलशेती उघड्यावर केली जाते, तेथे अधिक फटका बसला. जिल्ह्यात केवळ ३० टक्के फूलशेती पॉलिमरखाली केली जाते.
सध्याचे दर
झेंडू-१५० ते १७० किलो
पांढरी शेवंती- २०० ते २२० किलो
निशिगंधा बंडल २० ते २५ रुपये
गुलाब बंडल – ३० ते ३५ रुपये
जरबेरा बंडल १०० ते १२० रुपये
फूलशेतीचे ८० टक्के नुकसान झाले आहे. शेवंती, झेंडूची झाडे आडवी झाली. दसऱ्यासाठी फुले काढण्याचे नियोजन केले होते. गणपती उत्सवापासून फुले महागलेली आहेत. त्यात अधिक भर पडेल. पॉलिमरखालची फूलशेती कशीबशी वाचली.
सचिन तिडके, मोहाडी, फूल उत्पादक
महिनाभरापासून फुल व्यवसायास महागाईचा फटका अन् शेवंतीला सर्वाधिक मागणी असते, परंतु ही फुले पावसामुळे महागतील. पावसामुळे मागणी मागील वर्षातील नवरात्रापेक्षा यंदा मागणी ३० टक्के घटली आहे. ऐन सणासुदीत फूलउत्पादक तोट्यात गेलेला आहे.
सागर विधाते, फूलविक्रेता




