नाशिक | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून एका प्रभागातील अपक्ष उमेदवाराचा फोटो ‘मॉर्फ’ करत तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रभाग क्रमांक २९ मधील अपक्ष उमेदवार तथा भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
‘मॉन्टी दळवी’ या नावाने असलेल्या संशयित इन्स्टाग्राम खात्यावरून ही आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करण्यात आल्याचे शहाणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. निवडणूकीतील अर्ज नोंदणी, छाननी आणि माघारीच्या टप्प्यात प्रभाग २५ व २९ मध्ये उमेदवारांमध्ये राजकीय संघर्ष आणि राडा झाला हाेता. भाजपचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ न मिळाल्याने शहाणे यांना अखेरीस अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांकडून बदनामी करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येताे आहे.
शहाणेंसारखा दिसणारा हुबेहुब चेहरा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ‘मॉर्फ’ करून त्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आले. संबंधित पोस्टखाली ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ यासह आक्षेपार्ह मजकूर लिहून तो साेशल मिडिया प्लॅटफाॅरर्मवर व्हायरल करण्यात आला. या प्रकारामुळे निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोपही करण्यात आला असून अंबड पोलिसांनी (Ambad Police) या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित साेशल मिडीया अकाउंटधारकाचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. राजकीय खुन्नस काढण्यासह अन्य कारणांसाठी झालेल्या या सायबर वाॅरमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
सायबरची गस्त
निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावरून (Social Media) वाढणारा अपप्रचार, एआय फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा गैरवापर लक्षात घेता शहर पोलिसांच्या सायबर शाखेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. दोन गटांमध्ये किंवा उमेदवारांमध्ये तेढ निर्माण करून शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून, स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखाही सतर्क झाल्या आहेत.





