नाशिक | Nashik
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या (Nashik-Trimbakeshwar Road) रुंदीकरणाच्या प्रश्नावर निर्माण झालेल्या तणावानंतर अखेर संवादाचा मार्ग निवडण्यात आला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे रुंदीकरण अत्यावश्यक असल्याचे मान्य करतानाच, ‘कोणत्याही नागरिकाचा संसार उद्ध्वस्त न करता विकासाचे काम होईल, अशी ग्वाही राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणामुळे परिसरातील लहान-मोठे व्यावसायिक, शेतकरी आणि रहिवासी यांच्यात नाराजीचे वातावरण होते. मागीलवेळी या भागात आंदोलनामुळे रस्ता ब्लॉक झाल्याचा अनुभव असून, येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात चारपट गर्दी अपेक्षित असल्याने, प्रशासनावर या रस्त्याच्या कामाचा मोठा ताण आहे. अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेत काही व्यापाऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर गदा येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, हिंदू जनआंदोलन आणि शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी स्थानिकांच्या भावना मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी ‘विकासाबरोबरच लोकांची मदत करण्याचा स्पष्ट निर्देश दिला असून, कोणालाही विनाकारण त्रास न देता काम पार पाडावे, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे महाजन यांनी सांगितले.
महाजन पुढे म्हणाले की, ‘मी स्वतः ५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करणार आहे. कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त काम कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार असून, जास्तीत जास्त जमीन वाचवण्यावर भर दिला जाईल. जर जमीन घ्यावीच लागली, तर योग्य मोबदला देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. बैठकीत (Meeting) शेतकरी संघर्ष समितीचे आमदार सरोज अहिरे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी नगरसेवक अॅड तानाजी जायभावे, कैलास खांडबहाले, अॅड. प्रभाकर खरोटे, उत्तम खांडबहाले, भिवाजी भावले विश्वास नागरे, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान उपस्थितांनी एनएमआरडीएच्या (NMRDA) जाचक भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विविध प्रश्न मांडून बस्तुस्थितीची जाणीव गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. या मोहिमेमुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत, काहींच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेकांचे रोजगार बुडालेले आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने हे नुकसान टाळण्यासाठी जागरूकतेने पावले उचलावीत, अशी विनंतीही करण्यात आली. या चर्चेमुळे त्र्यंबकेश्वर रुंदीकरणाबाबतचा वाद शांततेकडे झुकत असून, विकास आणि लोकहित यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत होते.
ठाकरेंचे काम ‘पर्यटनासारखे’ होते
उद्धव ठाकरे यांनी निधी किती मिळाला हे पाहण्यासाठी धाराशिवला जाऊ नये, तर घरात बसून पाहणी करावी, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पक्षीय कार्यक्रमासाठी मंत्री महाजन नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. ते म्हणाले, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे ५, ६ नोव्हेंबर रोजी धाराशिव दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी निधी किती मिळाला हे पाहण्यासाठी धाराशिवला जाऊ नये, तर घरात बसून पाहणी करावी, मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी जनतेसाठी काहीच केले नाही, त्याचे काम ‘पर्यटनासारखे’ होते, त्यामुळे आता दौऱ्यावरून टीका करणे त्यांना योग्य नाही, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पैसे मागणाऱ्या कर्मचा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.




