पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
आषाढ शुक्ल द्वितीया,शुक्रवार (दि.२७ जून) रोजी पंचवटीमध्ये श्री जगन्नाथ रथोत्सवाचा (Shri Jagannath Rath Festival) पारंपरिक व भव्य सोहळा पार पडणार आहे. पंचमुखी हनुमान मंदिर (Hanuman Temple) येथून सकाळी १० वाजता नित्य पूजन व आरतीनंतर रथोत्सवास सुरुवात होणार असल्याची माहिती महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज (Bhakti Charandas Maharaj) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रथाच्या पुढे हनुमान ध्वज, पारंपरिक वाद्यवृंद, कैलास मठाचे वेदपठण करणारे विद्यार्थी, शंखनाद, डमरू वादन, आनंद ठाकूर यांचे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, ढोल पथक, बँड आणि रथावर सजवलेल्या श्रीजगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती असतील. रथाच्या मागे साधू-संत, महंत सहभागी होतील. या यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोप वाटप, प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती आणि शेवटी स्वच्छता पथकाद्वारे मार्गाची स्वच्छता करण्यात येणार आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी (Male) स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली असून, रथमार्गात ठिकठिकाणी स्वागत, पूजा, आरती व प्रसाद वाटप होणार आहे. या दिवशी सकाळी आठ वाजता पंचमुखी हनुमान मंदिरात श्रींची आरती, शृंगार, भोग-नैवेद्य अर्पण करून मूर्ती रथात स्थापण्यात येतील.
दरम्यान, रथ आडगाव नाका – गणेशवाडी – गाडगे महाराज पूल – नेहरू चौक – मेनरोड – रविवार कारंजा – अहिल्यादेवी होळकर पूल – मालेगाव स्टँड – पंचवटी कारंजा – शिवाजी चौक – सीतागुफा – काळाराम मंदिर – नागचौक – कृष्णनगर – आणि शेवटी समारोप पुन्हा पंचमुखी हनुमान मंदिरात येणार आहे. या रथोत्सवानिमित्त बारा दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवाची सांगता गुरुपौर्णिमेला होणार आहे, असेही महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मधुसूदन काबरा, धनंजय बेळे, मुकुंद खोचे, लक्ष्मण सावजी, नरहरी उगलमुगले, महंत राजारामदास महाराज, बाळासाहेब पाठक, सचिन लाटे, नंदु कहार, राहुल बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.





