नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनपाच्या वतीने शहरातील द्वारका भागातील (Dwarka Area) हजरत सातपीर बाबा दर्गा अतिक्रमणावर झालेली कारवाई बेकायदेशीर आहे. दर्ग्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा करत मनपा विरुध्द सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली होती.
मनपाने दि. १६ एप्रिल रोजी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा कारवाई करुन अतिक्रमण काढले, तर त्याच दिवशी दुपारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती आदेश दिले, मात्र तोपर्यंत कारवाई झालेली होती. त्यानंतर आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Hearing) पार पडली असता महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मनपा विरुध्द दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा (Petition) निर्णय महापालिकेच्या बाजूने देण्यात आला आहे. तसेच याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नव्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने मागील तारखेला अतिक्रमण काढण्यास देण्यात आलेले स्थगितीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. कारण स्थगिती आदेश देण्यापूर्वीच महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई (Action) केलेली होती.
दरम्यान, द्वारका परिसरातील सातपीर बाबा दर्गा येथे मंगळवारी (दि.१५) रोजी रात्री अतिक्रमणावरून (Encroachment) झालेल्या वादावरून तुफान राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी याबाबत कारवाई करत या संपूर्ण परिसरातील रस्ते बंद केले होते. यानंतर चार दिवसांनी बॅरेकेटिंग बाजूला करुन मार्ग सुरू करण्यात आले. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता कायम असून, परिसरात पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे.