नाशिक | Nashik
काल (रविवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः नाशिकसाठी (Nashik) एक प्रकारे निराशाजनक ठरला आहे. आगामी सिंहस्थ मेळा, वाढती लोकसंख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता नाशिकसाठी भरीव तरतूद होणे अपेक्षित होते. मात्र, या अर्थसंकल्पात नाशिकचा साधा उल्लेखही न झाल्याने नाराजी दिसून येत आहे.
नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ मेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो जागतिक स्तरावरील एक भव्य आयोजन आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक या मेळ्याला उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंगरोड, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, रस्ते, आरोग्य सेवा, स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी विशेष केंद्रीय पॅकेज जाहीर होणे आवश्यक होते. मात्र, या अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. नाशिक हे धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात महत्वाचे शहर आहे. तरीही शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेला निधी मिळालेला नाही.
शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) अपुरी बससेवा, पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज व्यवस्था, प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यावर उपाययोजना करण्यासाठी भरीव तरतुदी आवश्यक होत्या. अर्थसंकल्पात नाशिकसाठी स्वतंत्र तरतुद नसल्याने विकासकामांना मोठा फटका बसणार आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहराला सिंहस्थासाठी विशेष निधी न देणे हे राज्यावर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. काही निवडक राज्यांना झुकते माप देऊन इतर राज्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे.
राज्य शासनानेच अद्याप तयारी केलेली दिसत नाही. तेव्हा केंद्र सरकारकडून तरी काय अपेक्षा करणार? या अर्थसंकल्पात काही ठोस निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याचा साधा उल्लेखही दिसला नाही. केंद्र व राज्य निधीची तरतूद करुन कामांना सुरवात करावी.
महंत भक्तिचरणदास महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते वैष्णव आखाडा परिषद
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या अनुषंगाने निधीची ठोस तरतूद करण्याची मागणी केली होती. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात नाशिकबाबत कोणतीही सकारात्मक तरतूद दिसून येत नाही, ही अत्यंत निराशाजनक बाब आहे.
राजाभाऊ वाजे, शिवसेना (उबाठा) खासदार





