इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) जुन्या कसारा घाटात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असुन अनेक ठिकाणी कथडे तुटले असल्याच्या कारणामुळे घाटातील महामार्ग (Mahamarg) दुरुस्त करण्यासाठी घाटातील रस्ता बंद करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्यापासून पुढील सहा दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे परिपत्रक वाहतुक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी काढले असल्याची माहिती महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात (Old Kasara Ghat) रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दोन टप्प्यात पुढील ६ दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
साेमवार दि. २४ फेब्रुवारी ते गुरुवार दि. २७ फेब्रुवारी या कालावधीत तसेच ३ मार्च ते ६ मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई लेनवरील (Nashik-Mumbai Lane) नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागेल. तसेच अवजड वाहनांना सहा दिवस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहनांची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. परंतु, या दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मार्गे वळविण्यात येणार आहेत. म्हणून वाहनचालक व प्रवाशांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून प्रवास करावा.
दरम्यान, कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती व त्यामुळे वळविण्यात येणारी वाहतुक मार्ग लक्षात घेता मुंबई-नाशिक-शिर्डी (Mumbai-Nashik-Shirdi) असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधी दरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत. जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढली जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात त्रास होणार नाही, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांकडून करण्यात आली होती.