चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने (Kisaan Sabha) चांदवड शहरातुन जाणारा चांदवड -मनमाड, लासलगाव महामार्गावर (Chandwad-Manmad Highway) आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय किसान सभा चांदवडच्या वतीने चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर आज (सोमवारी) दुपारी १.३० च्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यांच्या वतीने विविध घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे मनमाड, लासलगाव महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथकांच्या तुकडीने बंदोबस्त ठेवला होता. यावेळी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना आपले निवेदन किसान सभेच्या वतीने सादर करण्यात आले. यानंतर किसान सभेचा लाँग मार्च नाशिकच्या (Nashik) दिशेने रवाना झाला.




