Monday, February 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार' जाहीर; अभिनेते सयाजी शिंदेंसह...

Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर; अभिनेते सयाजी शिंदेंसह ‘यांचा’ होणार सन्मान

नाशिक | Nashik

मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे (Kusumagraj Pratishthan) दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ (Godavari Gaurav Award) यंदाही जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार (दि. १० मार्च) रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या पुरस्कारासाठी (Award) विज्ञान, साहस, चित्रकला, लोकसेवा, नाट्य आणि संगीत या विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. डॉ. अनिरुद्ध पंडित (विज्ञान), आशिष माने (साहस), चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकला), अभिनेते सयाजी शिंदे (लोकसेवा), अभिनेते प्रशांत दामले (नाट्य) आणि उस्ताद उस्मान खान (संगीत) यांना यंदाचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

YouTube video player

दरम्यान, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार आज केवळ नाशिकपुरता (Nashik) मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक मानाचा सन्मान म्हणून ओळखला जातो. तात्यासाहेब शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.

कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा जपणारा पुरस्कार

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कवी प्रकाश होळकर (Prakash Holkar) यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना सांगितले की, “साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा जपणाऱ्या कुसुमाग्रजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. समाजासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हेच या पुरस्कारामागचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी म्हटले.

पुरस्काराचे स्वरूप

प्रत्येक पुरस्कार्थीस – २१ हजार रोख रक्कम
स्मृतिचिन्ह
सन्मानपत्र

ताज्या बातम्या