पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
शेतकरी (Farmer) आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा (Kisaan Sabha) ‘लाल वादळ’ मोर्चाने रविवारी (दि. २५ ) सकाळीच म्हसरूळमधून बिऱ्हाड उचलले व घोषणांनी आकाश दुमदुमवत पंचवटीतून मार्गस्थ झाला.
सुमारे तीन किलोमीटरहून अधिक रस्ता व्यापलेला हजारो आदिवासी बांधव शेतकर्यांचा शिस्तबद्ध मोर्चा शहरी नागरिकांचा कौतुकाचा विषय ठरला आहे. तो पाहण्यासाठी रविवार असूनही नागरिकांनी (Citizen) दूतर्फा गर्दी केली होती. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत होते व त्यांना पाठिंबाही दिला गेला.
हे देखील वाचा : Nashik News : ‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
मोर्चात सर्वांना शिक्षण – सर्वांना काम मिळालेच पाहिजे, शेतीमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर, तारवालानगर, दिंडोरी नाका, पंचवटी, मालेगाव स्टॅण्डमार्गे सीबीएसकडे रवाना झाला.
आदिवासी बहुलसह इतर तालुक्यांतून हजारो शेतकरी आपल्या मागण्या घेऊन मुंबईला (Mumbai) धडकणार आहेत. ते शनिवारी (दि.२४) रात्री नाशिक शहराच्या हद्दीत धडकले. म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील वनविभागाच्या परिसरात त्यांनी मुक्काम टाकला होता. रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी पोहचतच होते.
बळीराजासाठी धावले नगरसेवक
म्हसरूळ (प्रभाग क्रमांक एक) मधील नगरसेवक प्रवीण जाधव यांनी रात्री व आज सकाळी अनेक टॅकरमधून पाणीपुरवठा केला. रात्री वीजपुरवठ्याची व्यवस्था केली. आज सकाळी या हजारो शेतकऱ्यांसाठी खिचडी-भात तयार करून नाश्त्याची व्यवस्था केली. तसेच आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगर येथे मोर्चातील नेत्यांचा सत्कार केला. नगरसेविका दीपाली गीते व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनीही रिलायन्स पेट्रोलपंपासमोर मोर्चाच्या नेत्यांचा सत्कार केला व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी सदीच्छा व्यक्त केल्या.
वाढता वाढे मोर्चेकरी
दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, पेठ, हरसूल, त्र्यंबक, घोटी, इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील, तसेच शहरी भागातील मोर्चेकरी सहभागी आहेत. इतर भागातीलही शेतकरी सामील होत आहेत. माजी आमदार जे. पी. गावित, डाॅ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, भिका राठोड, जनार्दन भोये, उत्तम कडू, इंद्रजीत गावित, विजय घांगले, वसंत बागूल आदी अग्रभागी आहेत.
या मागण्यांसाठी लढा
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनजमीन व गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे, शिक्षणाचे खासगीकरण थांबवणे आणि पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना देणे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.




