नांदगाव । प्रतिनिधी
संसाराचा रहाटगाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाला पुढे नेतांना स्वत:चे आरोग्य चांगले राहील, याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. यासाठी पहिले प्राधान्य आरोग्याला दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी अनिल आहेर यांनी व्यक्त केले. ‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नांदगाव येथे आयोजित महिला आरोग्य महोत्सव आणि बचत गट जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने नांदगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. प्राचार्म डॉ.एस.आम.पटेल, तालुका अभिमान कक्षाचे विलास झाल्टे, नामको हॉस्पिटलच्या डॉ.प्राची डुबेरकर, देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे, जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने व्यासपीठावर होते.
अश्विनी आहेर म्हणाल्या की, २१ व्या शतकात स्त्री पुरुष भेदाभेद नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी ठसा उमटवला आहे. कुटूंबाची काळजी घेतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटूंबाला पुढे न्यायचे असेल तर महिलांनी स्वत:च्या आरोग्याला अग्रक्रम दिला पाहिजे. त्यासाठी वेळ काढला पाहिजे. महिलांसाठी देशदूत राबवित असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राचार्य पटेल म्हणाले की, महिला घराला घरपण देते मात्र तिच्या आरोग्याची उपेक्षा होते.
सुदृढ कुटूंबासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. डॉ.प्राची डुबेरकर म्हणाल्या की, शिक्षणाइतकेच महत्व विद्यार्थिनींनी आरोग्याला दिले पाहिजे. उपचारापेक्षा आरोग्याची दक्षता अधिक महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका अभियान कक्षाचे विलास झाल्टे यांनी महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
हेमंत अलोने यांनी प्रास्ताविकात आरोग्य महोत्सवाची भूमिका मांडली. देशदूतचे मनमाड तालुका प्रतिनिधी बब्बु शेख यांनी सूत्रसंचालन केले तर नांदगाव तालुका प्रतिनिधी संजय मोरे यांनी आभार मानले. आरोग्य महोत्सवासाठी सकाळपासूनच विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर अनेक महिलांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन विविध तपासण्या करुन घेतल्या. विद्यार्थिनी वजन, उंची, बीएमआय, रक्तदाब, रक्तातील साखर अशा प्राथमिक तपासण्या करुन घेण्यासाठी उत्साहाने पुढे आल्या.
डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडे तपासणी व समुपदेशनासाठी दाम्पत्यांनी हजेरी लावली. नामको हॉस्पिटलच्या कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.प्राची डुबेरकर, वैद्यकीय समन्वयक डॉ.पंकज दाभाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती नवले यांनी विद्यार्थिनी व महिलांची तपासणी केली. त्यांना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महेश बेंडकुळे, आरोग्य मित्र पुंडलिक चोरटे, परिचारिका सपना विसपुते, पुष्पा गाडगीळ यांनी सहाय्य केले. डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनाली लोंढे यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यांना रश्मी वाहब यांनी सहाय्य केले.
बचत गटांची जत्रा
यावेळी बचतगट जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बारा बचतगटांंनी सहभाग नोंदवला. यात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी स्वराज्य संंयम् (न्यायडोगरी), गणेश व साईश्रध्दा (मल्हारवाडी), एकता (साकोरा), जय बाबाजी (न्यायडोगरी), शिवगौरी (न्यायडोगरी), बिजासनी (न्यायडोगरी), एकता (न्यायडोगरी), लक्ष्मी माता (पिपरखेड) हे बचतगट जत्रेत सहभागी झाले होते. बचत गट जत्रेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभिमान (उमेद) अंतर्गत नांदगाव तालुका पंचायत समितीच्या अभिमान कक्षाचे सहकार्य लाभले.
सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून देशदूततर्फे जिल्हाभरात १०० सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. आजच्या आरोग्य महोत्सवात नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात आले. देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थिनींकडे हे मशिन सुपूर्द केले. जिल्ह्यातील १०० शाळा, महाविद्यालये व काही सार्वजनिक स्थळी हे मशिन्स बसविण्यात येणार आहेत. आवश्यक त्या महाविद्यालयांना डिस्पोजल मशिनही देण्यात येणार आहेत.