नाशिक |प्रतिनिधी
सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया तब्बल तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे.या प्रक्रीयेला अखेर मुहुर्त सापडला असून नियुक्तीसाठी कागदपत्रांच्या तपासणीसाठी संबंधित उमेदवारांना मंगळवारी (दि.३)कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे.अनुकंपाच्या ६४ रिक्त जागा यातून भरण्यात येणार आहे.या उमेदवारांना तात्काळ अथवा एक दोन दिवसामध्ये नियुक्तीपत्र देण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत सन २०१५ मध्ये अनुकंपा तत्वावर भरती करण्यात आली होती.त्यानंतर चार वर्षांपासून रिक्त होणार्या जागा अनुकंपा तत्वावर भराव्यात यासाठी उमेदवारांचा पाठपुरावा सुरू होता.जिल्हयात २९६ उमेदवार असून त्यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता, जिल्हा परिषदेने त्यांची भरती करण्याचा निर्णय करण्यासाठी यापूर्वी त्यांच्याकडून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज मागवले. त्यानुसार त्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती.
यापूर्वी देखील या उमेदवारांना वेळी कागदपत्रे छाननीसाठी बोलविण्यात आले होते. तर कधी मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर कधी बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे या बैठका झाल्या नाहीत. विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलवले. मात्र, याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने शासनाकडे अनुकंंपा नियुक्तीच्या अनुषगांने परिचर नियुक्ती संदर्भात मागविण्यात आलेले मार्गदर्शन पत्र विभागाला प्राप्त झाले.
या पत्रात सद्यस्थितीत सर्व जिल्हा परिषदेकडील सन २०१९ मधील पदभरती मध्ये वर्ग-४ ची पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पदभरतीत समावेश नसलेली पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राहय धरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच जेष्ठता सूची तयार करून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले. याचाच अर्थ परिचरांना अनुकंप नियुक्ती प्रक्रीयेत नियुक्ती देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते.
यावर जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविले असता,त्यावर शासनाने रिक्त जागांच्या २० टक्के गट क व ड मधून सर्व पदे भरावी असा आदेशच काढला.
त्यानुसार,पात्र उमेदवारांना मंगळवारी (दि.३) कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलविण्यात आले आहे. यात शैक्षणिक अर्हता, मार्कशीट, मुळ कागदपत्र पडताळणी होईल. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जातील. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचार्यांची यादी २९६ असली तरी त्यातील ११९ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात पात्र ठरवण्यात येणार असून त्यातील ६४ उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार होते. याच उमेदवारांना पाचारण करण्यात आले आहेत