सातपूर।प्रतिनिधी
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ’टायगरमॅन’ या अवघड ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिकचे डॉ.सुभाष पवार यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी निर्धारित वेळेच्या आत यशस्वीपणे पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकावला.
आयर्नमॅन प्रमाणेच अवघड असलेल्या ’टायगरमॅन’ स्पर्धेचे स्वरूप म्हणजे सुरुवातीला ३ किलो मीटर स्विमिंग सव्वा दोन तासात पूर्ण करायची,नंतर अवघड अशा चढणीच्या रस्त्याने १२० किलो मीटर अंतर माऊंट सायकलिंग करीत सव्वा सहा तासात पूर्ण करायचे आणि त्यानंतर २५ किलो मीटर रनिंग ४ तासात पूर्ण करून सर्व तीन्ही प्रकार साडे बारा तासात पूर्ण केले.
नागपूर येथे आयोजित टायगरमॅन स्पर्धा सातपूर येथील रोहित हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुभाष पवार यांनी निर्धारित वेळेपेक्षा एक तास ४० मिनिटे अगोदरच म्हणजे १० तास ५० मिनिटात पूर्ण करुन यश संपादन केले.डॉ सुभाष पवार यांचे वय ६४ वर्षे आहे. या वयात स्पर्धा पूर्ण करणारे व इतर वयोगतीलही नाशिकचे पहिलेच टायगरमॅन ठरलेत.
या स्पर्धेत देशातील २५० स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यांना फिटनेस प्रशिक्षक मुस्तफा टोपीवाला तसेच नुकतेच आयर्नमॅन झालेले नाशिकचे प्रशांत डबरी व महेंद्र छोरिया यांचे मार्गदर्शन लाभले. टायगरमॅन स्पर्धेत प्रथम विजेते डॉ.पवार (६४ वर्ष), द्वितीय क्रमांक ४६ वर्षीय स्पर्धकाने मिळविला.या स्पर्धेतील यशानंतर डॉ.पवार लवकरच आयर्नमॅन या जगातल्या सर्वात अवघड स्पर्धेत भाग घेणार आहेत.