Monday, November 25, 2024
Homeनाशिकलढा करोना योद्धांचा

लढा करोना योद्धांचा

नाशिक । खंडू जगताप

करोनाच्या संसर्गाने सर्व जगभरातच हाहाकार उडवला आहे. या करोनाशी लढा देण्यासाठी तसेच सर्व सामान्यांच्या रक्षणासाठी आरोग्य विभग व पोलीस हे करोना योद्धे जीवाची बाजी लावून कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात मालेगाव हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या ठिकाणी पोलीस दलात कार्यत अनेक करोना योद्धयांना करोनाने घाटले. परंतु वरि अधिकार्यांसह सर्वांचा पाठिंबा व सकारात्मक्ता यातून आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत या योद्धयांनी करोनालाच हरवले. यातील काही योद्धयांचा करोना सोबतचा लढा त्यांच्याच शब्दात क्रमश देशदूतच्या वाचकांसाठी..

- Advertisement -

भितीवर कर्तव्याची मात

मालेगावातील पहिला बळी गेलेल्या पवारवाडी परिसरात आमची ड्युटी लागली. भिती सर्वांनाच होती. परंतु प्रत्यक्ष वरिष्ठ सर्वत्र फिरत आहेत म्हटल्यावर आम्हीही कर्तव्यात मागे येणे अशक्य होते. पवारवाडीच्या चौकात बॅरीकेंडींग करून चेकपॉईंटवर आम्ही कार्यरत होतो. नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यापासून रोखण्याची जबाबदारी आमच्याकडे होती. याच काळात पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने माझा व सहकार्‍याचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. खूप खूप भिती वाटली. परंतु वरिष्ठांनी दिलेला आधार आणि विश्वासाने सतत सकारात्मक विचार करत अखेर करोनावर मात केली. तर कर्तव्याने भितीवर मात केली. यामुळे होम क्वारंटाईन पूर्ण होताच लगेच कर्तव्यावरही हजर झालो आहे, अशा भावना मांडल्या आहेत करोना योद्धे शांताराम पंढरिनाथ घुगे यांनी.

मी ग्रामिण पोलीस मुख्यालय, आडगाव येथे गुन्हे शाखेत कार्यरत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर मालेगाव येथे पोलीस बळाची कमतरता भासू लागली. यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या आदेशाने मुख्यालयातील गुन्हे शाखेसह इतर शाखेतील आमच्या ५० जणांच्या पथकाला मालेगाव येथे जाण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार ११ एप्रिल रोजी आम्ही मालेगावी पोहचलो. प्रत्येकाला विभागून कर्तव्य देण्यात आले होते. माझी ड्यूटी मालेगावातील पहिला करोना पॉझिटिव्ही रूग्ण आढळलेल्या पवारवाडी परिसरात लागली. यामुळे मनात भिती निर्माण झाली होती. कुटुुंबियही काळजी करत होते. तत्पुर्वी मुख्यालयी असल्यापासून करोनाबाबत घ्यावयाची काळजी, दक्षता, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर याबाबत अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळत होते. ड्युटीपुर्वी तेथील काही अधिकारी व वरिष्ठांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करून मास्क, सॅनिटायझर, व्हिॅटमिन सी च्या गोळ्या तसेच इतर साधने आम्हाला देण्यात आली होती.

पवार वाडीतील चौकात आमचा चेकपॉईंट होता. या ठिकाणी मी, माझा सहकारी व दुसर्‍या पाळीत दुसरे दोघे सहकारी अशी चार जणांची ड्यूटी होती. पवार वाडी परिसर खूप गर्दीचा परिसर आहे. येथे पॉझिटिव्ह रूग्ण आढळूनही तसेच आम्ही सतत सांगुनही येथील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दवाखाना, मेडिकल अशी कारणे नागरिक सांगत त्यांना अडवणे अवघड होऊन बसे. तरी कायम चौकशी, तपासणी, नागरिकांना समजावून सांगणे अशी आमचे कर्तव्य सातत्याने सुरू होते. साधारण १५ दिवसांनी इतर काही लक्षणे नसली तरी मला घसा दुखीचा त्रास सुरू झाला. याबाबत वरिष्ठांच्या निदर्शनास आणताच २७ एप्रिलला आमच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले.

यामध्ये मी व माझा सहकारी दोघांचेही स्वॅब पॉझिटिव्ह आले. आपल्याला करोना झाला आहे या विचारानेच खूप खूप भिती वाटली.परंतु वरिष्ठ अधिकार्‍यानी आमची माहिती घेऊन तुम्हाला काही होणार नाही. आरोग्याची सर्व काळजी घेण्यात येईल, भिती बाळगू नका असे आश्वस्थ केले. ३० एप्रिलला आम्हाला नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी कर्तव्यावर असणारे डॉक्टर, परिचारीका यांनी आम्हाला कायम सकारात्मक विचार दिले. तुम्ही बरे होताय, काहिच झालेले नाही असे बोलून आमचा आत्मविश्वास वाढवला. या काळात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे व अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचे मोबाईलवर कॉल आले त्यांनी आम्हाला तुम्ही लवकर बरे होत आहात असे सांगत खूप आधार दिला. सकारात्मक विचार करत राहण्याच्या सुचना दिल्या.

या काळात मी बातम्यांपासून दूर होतो. मोाबईलवर अगदी विनोदी कार्यक्रम पाहून मनोरंजन करत होतो. आणि या सर्वाच्या परिणामी १४ मे रोजी मी करोनावर मात करून रूग्णालयातून बाहेर पडलो. आमचे जंगी स्वागतही झाले. यानंतर मेटच्या वसतीगृहात एक दिवस कवारटाईन करण्यात आले. यानंतर घरी ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. सर्व कुटुंबिय जवळ असूनही भेटता येत नसल्याचे दु:ख होते. परंतु मी करोनावर मात केल्याचा आंनद सर्वांच्याच चेहर्‍यावर होता. हे सात दिवसही पूर्ण झाले. आणि कुटुंबिय नाही म्हणत असतानाही दुसर्‍याच दिवशी मी पुन्हा कर्तव्यावर हजर झालो. भिती कुठल्या कुठे पळाली होती. कारण भीतीवर कर्तव्यानेच मात केलेली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या