Friday, May 3, 2024
Homeनाशिकश्रेयवादाचे राजकारण करण्यापेक्षा मला जनतेची कामे होणे अधिक महत्वाचे -खा.डॉ.भारती पवार

श्रेयवादाचे राजकारण करण्यापेक्षा मला जनतेची कामे होणे अधिक महत्वाचे -खा.डॉ.भारती पवार

जानोरी । वार्ताहर

पेठ बायपासच्या मंजुरी नंतर श्रेयवादातून वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मी खासदार म्हणून काम करत असतांना आता वर्ष पूर्ण झाले आहे. यावर्षपूर्ती दरम्यान मी माझ्या मतदार संघाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अनेक महत्वांच्या कामांचा पाठपुरावा करत आहे. मग त्यात पेठ बायपासचे काम असो, हयासह प्रस्तावित असलेले मनमाड बायपास, नासिक-दिंडोरी-कळवण व मालेगाव-मनमाड राज्य रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देणे, निफाड ड्राय पोर्ट अशा अनेक कामांना मंजुरी मिळणेकामी पाठपुरावा करत आहे तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भातील कांदा, द्राक्ष व आदी शेतीमाल निर्यातीचा प्रश्न, H.A.L., रेल्वे, विमान वाहतूक प्रश्न मार्गी लावणेसाठी मी संसदेत तथा संबंधित मंत्रालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे.

- Advertisement -

पेठ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आता वाहतूक कोंडी  न होता पेठ शहराच्या बाहेरून ह्या बायपासचे काम लवकर सुरू होणार असून बऱ्याच दिवसांची पेठवासीयांची मागणी पूर्ण होणार आहे. पेठ शहराच्या शिष्टमंडळाने मला ह्या बायपासचे काम त्वरित होण्याकरिता पत्र दिले व त्यानंतर  केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करत ह्या कामाल  सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. मागील खासदारांनी ह्या कामासाठी देखील पत्रव्यवहार केला असेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

खासदार म्हणून मी पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभर सातत्याने पेठ बायपाससाठी पाठपुरावा केला आणि या बायपासच्या कामास मंजुरी मिळाली. ह्या संदर्भातील बातम्या  माझ्या छायाचित्रांसह वृत्तपत्रात  प्रसिद्ध झाल्या. पण ह्यातही कुत्सित बुद्धीने नकारात्मक राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन श्रेयवादाच्या नावाखाली  राजकारण करण्याचा काही राजकीय नेत्यांनी प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे. पण सदर काम मंजुरी बाबत काही नेते समाधानी नसून आजी माजी लोकप्रतिनिधींमध्ये तेढ निर्माण करण्यात त्यांना अधिक रस असल्याचे दिसते.

ह्या बायपासच्या कामासंदर्भात वर्षभर वेळोवेळी पाठपुरावा केला व त्यास केंद्रात अस्तित्वात असलेल्या भाजपच्या सरकारनेच या प्रकल्पास मंजुरी  दिली. त्यामुळे ह्याचे श्रेय भाजपालाच जाते. मी काम करत असतांना श्रेय कधीच घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि कधी घेणार पण नाही. फक्त जनतेच्या समस्यांचे निराकरण होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्यांना कोणाला श्रेयवादाचे राजकारण करावयाचे आहे. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा!

मला राजकारण नव्हे तर समाजकारण करायचे आहे. खासदार म्हणून काम करत असतांना मी केलेल्या कामांची पावती किंवा श्रेय मला मिळेल अथवा नाही मिळणार याचा जास्त विचार न करता पुढील काळात मला माझ्या दिंडोरी मतदारसंघातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य, गोर-गरीब तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत काम करायचे आहे. मला  श्रेयवादाच्या कुठल्याही वादात अडकायचे नसून मला जरी श्रेय मिळाले नाही तरी चालेल पण जनतेची कामे होणे हे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या