नाशिक । प्रतिनिधी
नाशिककरांचा जीवाभावाचा सखा दै.‘देशदूत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरु झाले आहे.आज दि.४ रोजी कळवण येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आर.के.एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘देशदूत’ने सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील २० ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील नामांकित नामको हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करुन मौलिक मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, हाडांचे विकार, मान, पाठ, गुडघे, कंबरदुखी या तपासण्या यावेळी केल्या जाणार आहेत.
कळवण येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटनासाठी नगराध्यक्षा सौ. रोहिणी महाले, कळवण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अॅड. शशिकांत पवार, नामको बँकेचे संचालक देविदास संचेती, नगरसेविका अनिता जैन, प्राचार्य एल. डी. पगार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
बचत गटांची जत्रा
आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणीच बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.
सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन
सामाजिक भान जपत देशदूततर्फे आर.के.एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात येणार आहे.