नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील सामानगाव,चेहडी भागात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या (Leopard) अखेर जेरबंद झाल्याने शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असून, वनविभागाच्या पथकाने त्यास पुढील कारवाईसाठी म्हसरूळ येथे रवाना केले आहे.
शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजसमोर असलेल्या चेहडी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसून येत असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाले होते. शेतात (Farm) काम करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी माजी नगरसेवक पंडित आवटे यांच्या द्राक्ष बागेत पिंजरा लावण्यात आला होता.
शनिवारी पहाटे आवारे यांचे बंधू भारत आवारे हे द्राक्ष बागेला औषध फवारणी करण्यासाठी गेले असता, पिंजऱ्यात बंद झालेल्या बिबट्याने डरकाळी फोडली. त्यानंतर आवारे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना (Forest Officer) कळविले असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जेरबंद बिबट्याला ताब्यात घेतले.बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.




