सिन्नर | वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील शिवडे सोनांबे रस्त्यालगत (Shivde Sonambe Road) शिवडे गावापासून एक किमी अंतरावर विलास राजाराम हारक यांच्या घराच्या पडवीत बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हारक यांच्या पडवीत पाळीव कुत्रा बसलेला असताना रात्री अकराच्या सुमारास भक्षाच्या शोधात बिबट्या अलगद पडवीत शिरला. यावेळी कुत्र्याच्या (Dog) किंचाळण्याचा जोरात आवाज आला. त्यावेळी घरातील सर्वजण जागे झाले. यावेळी हारक उठून पडवीकडे गेले असता त्यांनी बिबट्याने दुसरीकडे उपद्रव करू नये म्हणून बाहेरून पडवीचा दरवाजा अलगद बंद केला. त्यामुळे बिबट्यामध्येच अडकला.
यानंतर विलास हारक यांनी शेजार्यांना आवाज देऊन बोलवले असता त्यांनी तात्काळ वनविभागाला (Forest Department) कळवले. त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दरवाजा जवळ पिंजरा लावत पहाटे तीन वाजता बिबट्याला रेस्क्यू केले. काल (शुक्रवार) रात्रीच तालुक्यातील गोंदे शिवारात बिबट्याने एका मुलीचा (Girl) बळी घेतला असून, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले होते. अशातच बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यातील बिबट्या जेरबंद करण्याची परिसरातील (Area) ही दुसरी घटना आहे.वनविभागाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या ठिकाणी जंगली प्राण्यांचे वास्तव्य जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी (Citizen) वन्यप्राणी दिसताच तात्काळ वनविभागाला कळविण्याचे आव्हान केले आहे. सिन्नरचे वन परीक्षेत्र अधिकारी हर्षद पारेकर, वनपाल संतोष हिंदे, वनरक्षक सौ. तांबे, वनमजूर बाबूराव सदगीर यांनी बिबट्याला रेस्क्यू केले.




