नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देवळाली रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅकवर आज (रविवारी) सकाळी एका बिबट्या (Leopard) जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. यानंतर नाशिक वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बिबट्याला बाजूला करून रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर जखमी बिबट्याला उपचारासाठी नेण्यात आले होते. पंरतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच बिबट्याचा एक पाय पूर्णपणे तुटून बाजूला पडला होता. यानंतर नाशिक विभागाच्या (Nashik Division) वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले. यानंतर पुढील उपचारासाठी बिबट्यास वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले होते.
दरम्यान, बिबट्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान (Treatment) त्याचा मृत्यू (Death) झाला. सदर बिबट्याचे वय अंदाजे ७ ते ८ महिने असल्याचे वन्यजीव पशु वैद्यक यांनी सांगितले.




