नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात (Bhonsla Military School) बिबट्या (Leopard) दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी वनविभागाचे बचाव पथक, गंगापूर पोलीस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात घनदाट झाडी व उंच गवत असल्याने ड्रोनच्या साह्याने वनविभागाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रशासनाशी चर्चा करून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचे दुपारचे सत्र रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना (Student) सुखरूपरीत्या शाळेमध्येच ठेवण्यात आले असून, शाळेचे सर्व लोखंडी दरवाजे बंद करून कुठलही विद्यार्थी वर्गातून बाहेर जाणार नाही याची दक्षता शाळा प्रशासनाने घेतली आहे. दुपारी जशा सूचना मिळतील तशा सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनच विद्यार्थ्यांना बस किंवा व्हॅनमध्ये सोडण्यात येईल, असे शाळा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तर वनविभागाचे अधिकारी, पोलीस आणि शाळा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागासह रेस्क्यू टीमचे पथक दाखल झाले आहेत.




