Tuesday, February 17, 2026
Homeनाशिकभवताल : शान-ए-हिंद अन् टिपू सुलतान…

भवताल : शान-ए-हिंद अन् टिपू सुलतान…

नाशिक | चंद्रशेखर शिंपी | Nashik

मालेगाव नवनिर्वाचित महापालिकेच्या उपमहापौर (Malegaon Deputy Mayor) शान-ए-हिंद यांनी महापालिकेच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावून नव्या वादाला तोंड फोडले. मालेगाव महापालिकेतील या कृतीचे पडसाद राज्यभर उमटले नसते तर नवलच! त्यातूनच पुण्यात भाजप व काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. टिपू सुलतान व वीर सावरकर यांच्या नावाभोवती सध्या राज्यातील राजकीय वातावरण पिंगा घालत आहे. मात्र, या राजकीय खेळीत इस्लामसारख्या पक्षांवर मतदारांनी टाकलेल्या विश्वासास तडा जात आहे.

- Advertisement -

मालेगाव हे मुस्लीमबहुल शहर आहे. एकेकाळी निहाल अहमद यांच्या नेतृत्वामुळे हे शहर जनता दलाचा बालेकिल्ला समजला जात असे. अनेक वर्षे त्यांनी या शहराचे नेतृत्व केले. परंतु, हळूहळू त्यांना आव्हान देणारे अनेक राजकीय नेते येथे उदयास आले. निहाल अहमद यांच्यानंतर २००९ पासून मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून उलेमा-ए-हिंदचे महासचिव मौलाना मुफ्ती मोहम्मद निवडून येत आहेत. आता महापालिका निवडणुकीत आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीने ८० पैकी ३५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. असे असले तरी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी त्यांनासमाजवादी पार्टी व काँग्रेसची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीनबानो या महापौर तर समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद या उपमहापौर आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेना व इस्लाम पार्टी यांच्यात सरळ लढत झाली होती. यात भाजप व एमआयएम पार्टी तटस्थ राहिली.

YouTube video player

पुरेसे संख्याबळ नसताना देखील शिवसेनेने महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार उभे केल्याने निवड बिनविरोध होऊ शकली नाही. याचीच सल उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या मनात असावी. सवंग प्रसिद्धी अथवा शिवसेनेला डिवचण्यासाठी त्यांनी आपल्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो लावला असावा, अशी चर्चा सुरू आहे. काही कार्यकत्यांनी महापौर व उपमहापौर यांना टिपू सुलतानचा हा फोटो भेट दिल्याचे समजते. परंतु महापौरांनी हा फोटो आपल्या दालनात लावला नाही. उपमहापौरांच्या दालनातील काही फोटो समाज माध्यमांवर झळकले व त्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावर शिवसेना नगरसेवकांपाठोपाठ भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

सध्या उपमहापौरांच्या दालनातून हा फोटो काढण्यात आला असला तरी दालनाच्या नूतनीकरणानंतर आपण हा फोटो पुन्हा लावणार असल्याचे उपमहापौर शान-ए-हिंद यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी (दि.१८) महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पुन्हा एकदा वादंग घडू शकते. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनीदेखील उपमहापौरांच्या कृतीचे समर्थन केलेले दिसते. टिपू सुलतान वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून भाजपकडून त्यांना विरोध केला जात आहे. इंग्रजांविरोधात देशासाठी लढताना बलिदान देणाऱ्या टिपू सुलतान यांचा फोटो लावला तर गैर काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे. मालेगावमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद हे राज्यभर लगेच उमटतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील टिपू सुलतान यांची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने त्यांच्याविरोधात भाजपची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मालेगाव मध्य विधानसभा व महापालिकेत सत्तेत आलेल्या अनेक पक्षांनी मालेगावचे प्रश्न सोडवण्याऐवजी जातीयवादाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतली आहे. यातून येथील मुस्लीम समाजाचेच वेळोवेळी नुकसान झाले आहे. आजदेखील या समाजापुढे दारिद्र्य, अस्वच्छता व अज्ञानाचे आव्हान आहे.

वास्तविक पाहता राजकारणाव्यतिरिक्त मालेगाव शहरातील लोकांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न आहेत. बकालपणा व अस्वच्छता या शहराला मिळालेली विरासतच म्हणावी लागेल. येथील महापालिकेतील भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराच्या अनेक सुरस कथा आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी या शहराने राज्यातील सर्वात प्रदूषित शहर असा ‘बहुमान’ मिळवला आहे. येथे होणाऱ्या भूमिगत गटार योजनेमुळे सांडपाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी सर्वत्र चिखल व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा संकलनासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला असला तरी शहर स्वच्छ होणे दूरच; परंतु सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. येथील मोसम नदी स्वच्छतेसाठी शेकडो रुपये खर्च झाले; मात्र आजही या नदीतून रक्त व सांडपाणीमिश्रित पाणी वाहत असते. शंभर कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मोसम पुलाला चार महिन्यांतच तडे गेल्याने त्यावर डांबराचे अस्तरीकरण करावे लागले आहे. अशीच अवस्था शहरातील सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांची आहे. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांना डांबराचे ठिगळ हा नवा पॅटर्न येथे अस्तित्वात आला आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून हे असेच चालू आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेससह (Congress) भाजपलाही नाकारून येथील नागरिकांनी इस्लाम पक्षाच्या पारड्यात घवघवीत यशा टाकले. आता ‘इस्लाम’ने जातीपातीच्या राजकारणात न अडकता मालेगाव शहराला लागलेला गलिच्छपणाचा डाग पुसला पाहिजे. महापालिकेत सत्तेत येण्यासाठी त्यांनी भाजपसह प्रत्येक पक्षाशी जशी सलगी वाढवली तशीच सलगी त्यांनी आता शहर सुधारणेसाठी वाढवावी. ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा देत मालेगाववरील जातीयतेचा, बकालपणाचा शिक्का पुसला पाहिजे. अद्याप बाळसे न धरलेल्या त्याच्या पक्षाला महापालिकेत घवघवीत यश मिळाले आहे. महापौराच्या रूपाने त्यांच्या घरातील चौथा सदस्य महापालिकेचे नेतृत्व करत आहे. पक्षाला महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मिळालेले यशाचे त्यांनी भविष्यातील राजकीय संधीत रूपांतर करणे हितावह आहे.

ताज्या बातम्या

Harshwardhan Sapkal : अखेर ‘त्या’ वक्तव्यावरून सपकाळांची दिलगिरी; म्हणाले, भाजपच्या गलिच्छ...

0
मुंबई | Mumbai काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना टिपू सुलतान (Tipu Sultan) यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान...