नाशिक | Nashik
सिंहस्थाच्या (Simhastha) निमित्ताने विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. मागील सिंहस्थाची दखल घेवून अमेरिकेत शासनाचा सन्मान करण्यात आला होता. यावेळेस देखील नाशिकमधील सिंहस्थ तीन ते चार पट मोठा होणार आहे. त्यामुळे याची देशभरात नाही तर जगभरात दखल घेतली जाईल. अतिशय वेगाने सिंहस्थाचे काम चालू असून, हा सिंहस्थ सुरक्षित आणि चांगला करायचा आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ५ हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दि.१३) रोजी ऑनलाईन पद्धतीने ठक्कर डोम येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, “२०२७ साली नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे सिंहस्थ होणार असून, गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सिंहस्थाचा लौकीक जगभरात पोहोचणाार आहे. नाशिकला रामकुंडावर जशी छोटी जागा आहे तशीच जागा त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावर आहे. यामुळे येणारा सिंहस्थ सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे.महापालिका आयुक्त मनीषा खत्री दिवसरात्र एक करून सिंहस्थाचे काम करत आहेत. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. सिंहस्थात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. तशीच खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. अनेकजण नाशिक शहर सोडून पळाले असून, खाटूशाम, जम्मू-काश्मीर याठिकाणी जाऊन स्वत:ला वाचविण्यासाठी देवाला साकडं घालत आहेत. नाशिक शहराचा विकास, पर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी सिंहस्थ महत्त्वाचा असून साधू-महंत आणि नाशिककरांनी सहभागी व्हावे, घरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज व्हावे”, असे आवाहनही गिरीश महाजन यांनी केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला विविध आखाड्याचे साधू-महंत, आमदार किशोर दराडे, पंकज भुजबळ, ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहूल आहेर, मंगेश चव्हाण, दिलीप बोरसे, विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एमएमआरडीए आयुक्त जलज शर्मा, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.
विकासकुंभाची अशी होणार सुरूवात
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित विकासकामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २ हजार २७० कोटी रुपये, तर नाशिक महानगरपालिकेतर्फे ३ हजार ३३८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पायाभूत सोयीसुविधा उभारणी, सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण, स्वच्छता, व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेचे सुलभीकरण, धार्मिक पर्यटनाच्या सोयीसुविधांचे अद्ययावतीकरणासाठी महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कामांसाठी एकूण ५ हजार ६५७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी ९४ कोटी ८७ लाख रुपये, नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयानासाठी ४३६ कोटी ५६ लाख रुपये, नाशिक शहरात मल:निस्सारण प्रकल्प उभारणीसाठी १ हजार ४७५ कोटी ५० लाख रुपये, नाशिक शहरात गोदावरी काठावर रामकाल पथनिर्मितीसाठी १२० कोटी ८८ लाख रुपये, नाशिक महानगरपालिकेतर्फे ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन हजार २७० कोटी ६० लाख रुपये किमतीचा रस्ते विकासाचा मोठा पायाभूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटनाच्या सुविधा व धार्मिक वारसा संरक्षणात मोठी भर पडणार आहे.




