नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ मेळाव्यात (Simhastha Melava) साधूग्राम उभारणीच्या निमित्ताने तपोवनातील शेकडो झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. महापालिकेच्या या वृक्षतोडीविरोधात आज (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अमेय खोपकर (Amey Khopkar) यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सिंहस्थ मेळा ही आपली परंपरा, पण त्यासाठी हिरवळीचा बळी देणे अमान्य, असे मत अनेकांनी मांडले. याप्रसंगी कलाकार, तंत्रज्ञ, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खोपकर म्हणाले की, नाशिकची ओळख सिंहस्थ मेळा नगरी म्हणूनही जागतिक स्तरावर बनलेली आहे. आपल्या आध्यात्मिक अस्तित्वाची प्रचिती देणारा मेळा हा श्रद्धेय उपक्रम परंपरेनुसार होऊ घातला आहे. मात्र त्याआडून साधूग्राम वसविण्यासाठी वृक्षांचा बळी देण्याचे क्रूर नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे.
या भ्रष्ट व मनमानी शासकीय कारभारा हा फक्त जमीन लाटण्यासाठी असून, धर्माच्या नावाने, जाती पातीचे राजकारण करून हे भ्रष्ट सरकार आपले हित साधत असून राज ठाकरे यांच्या या आवडत्या शहरास भकास करण्याचा हा डाव आहे. आम्ही साधू-महंतांचे स्वागत करतो. पण, उरावर बसून आम्ही कुंभमेळा होवू देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “या तपोवनातील एकही झाड आम्ही तोडू देणार नाही व असे प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने हा डाव उधळून लावू. सरकारने झाडावर (Tree) फुल्या मारलेल्या असून, हे आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखे आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे पार्थ पवारांना जसं माफ केलं तसं झाडांना देखील माफ करावं. झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मोठे आंदोलन उभारेल. एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये”, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला.
तसेच प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी बोलतांना सिंहस्थच्या नावाने होत असलेली वृक्षतोड हा फक्त व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्यासाठी होत असून, यामागे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात मूलभूत सुविधा निर्माण न करता व विकास कामाकडून सामान्य जनतेचे लक्ष विचलित होण्यासाठी हा वृक्षतोडीचा घाट घातला जात आहे. आपल्या नाशिक शहरात गेल्या आठ वर्षात एकही विकास कामे झालेली नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा याचा संपूर्ण बोजबारा उडालेला असून, आगामी मेळ्यात पाच ते सहा कोटी भाविक या शहरास येणार आहेत. त्यांच्या सुविधासाठी कुठलेही ठोस काम अजून पर्यंत प्रशासनाने या सरकारने केलेले नाही. हे त्यांचे नाकारते पण झाकण्यासाठी व जनतेचे त्याकडे लक्ष न जावो यासाठी हा वृक्षतोडीचा घाट घातला गेला आहे. साधूग्रामसाठी पर्यायी जागा असतानाही मूळ विषयापासून सामान्य माणसाला दूर नेण्यासाठी हा महायुती सरकारचा डाव आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील स्पष्टपणे वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यानंतर तपोवनातील वृक्ष तोडीसंदर्भातील काल (शुक्रवारी)शिंदेंच्या शिवसेनेने आंदोलन केले होते. यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील वृक्ष तोडीच्या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजू नका असा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेला दिला होता.




