नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
19 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 साली मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या बारा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. परंतु, संबंधित आरोपींनी पुन्हा मुंबई हायकोर्टात त्याविरुद्ध अपील केल्याने हायकोर्टाने या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या बारा जणांपैकी दोन जण नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात असून, त्यातील एक जण आजारपणामुळे पॅरोलवर आहे. तर दुसरा आरोपी कारागृहात असल्याने त्याची आज (सोमवार) सायंकाळी सुटका करण्यात आली.
मुंबई येथे लोकल गाडीमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटमध्ये 209 प्रवासी ठार झाले होते. त्यानंतर या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली होती. त्यातील मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी व मुजम्मिल अताउर रहेमान शेख हे दोन आरोपी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात 2016 पासून शिक्षा भोगत होते. त्यापैकी अन्सारी हा पत्नीच्या आजारामुळे पॅरोलवर सुट्टीवर आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मुजमिल शेख याच्याबाबतीत न्यायालयाकडून ई-मेल प्राप्त झाल्यानंतर कारागृहातून त्याची सायंकाळी सुटका झाली.




