सातपूर | प्रतिनिधी | Satpur
मनपा बांधकाम विभागात (NMC Pwd Department) मुकादम म्हणून कार्यरत असलेल्या विलास सावळीराम गावले (वय ५३) यांनी फायर स्टेशनलगत असलेल्या बांधकाम मनपा कार्यालयातील हजेरी शेडमध्ये सोमवारी (दि.८) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास गावले हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ड्युटीवर दाखल झाले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास त्यांना बांधकाम विभागाच्या हजेरी शेड परिसरात लोकांनी पाहिले होते, त्यानंतर काही वेळाने कार्यालयातील (Office) आतील बाजूस असलेल्या हुकाला त्यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. ही बाब लक्षात येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मनमिळाऊ स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या गावले यांच्या आत्महत्येने मनपा वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. मुलगा शिक्षण घेत असून मुलगी पुण्यामध्ये नोकरी करते. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. घटनास्थळी गावले यांनी एका चिठ्ठीत माझ्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही, मी स्वतःहून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. मात्र नेमकी आत्महत्या गावले यांनी का केली असावी? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
गावले हे नुकतेच पंधरा दिवसाच्या रजेवर देवदर्शन करून आपल्या नोकरीवर रुजू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेचा तपास सातपूर पोलीस करत आहे. मनपा सेवेमध्ये कार्यरत असलेले गावले यांची आत्महत्येची घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच उशीर झाला. मनपा विभागाने तात्काळ रुग्णवाहिका दाखल करण्याची गरज होती. मात्र, मनपा विभागाची रुग्णवाहिका येथील कर्मचारी उगले यांनी तसेच माजी नगरसेवक शशिकांत जाधव व पोलीस कर्मचारी निकुंभ व जाधव यांनी संपर्क केला असता देखील कुठल्याही प्रकारची तत्परता न दाखवल्यान रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाला. बऱ्याच उशिरानं तर रुग्णवाहिका पोहोचल्याने मयत गावले यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.




