नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गणेशोत्सवात (Ganeshotsav) पाच दिवस रात्री बारापर्यंत वाद्यनाद तर नवरात्रोत्सवात (Navratri) तीन दिवस मुभा राहणार असून, वर्षभरातील १४ सणांचा यात समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यभरात लवकरच गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांची धूम सुरू होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) विविध गणेश मंडळे, दांडिया गरबा आयोजन समित्या आणि सामाजिक संस्थांनी तयारीला सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांमध्ये नेहमीच ध्वनिक्षेपक वाजवले जातात. मात्र ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या नियमांनुसार रात्री १० नंतर वाद्य वाजवण्यास बंदी कायम आहे.
केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना वर्षातून १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी यंदाच्या वर्षासाठी १४ दिवस १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी निश्चित करून त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात गणेशोत्सवात ५ दिवस तर नवरात्रोत्सवात ३ दिवस १२ वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळातच नव्हे, तर दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष स्वागत यांसारख्या इतर महत्त्वाच्या सणांनाही रात्री १२ पर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे उत्सवप्रिय नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियम व मर्यादा
केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांनुसार, बंदिस्त सभागृहे सोडून खुल्या जागेत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतव वाद्य वाजवता येतात. मात्र, निवडलेल्या १४ दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंतची मुभा आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाच या परवानगीचे अधिकार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वर्षातील महत्वाच्या १४ सणाच्या तारखांना रात्री १२ वाजेपर्यंतची सवलत दिली आहे.
परवानगी असलेले दिवस (रात्री १२ वाजेपर्यंत)
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती गणेशोत्सव
२ सप्टेंबर गौरी विसर्जन (गणेशोत्सव)
३ सप्टेंबर गणेश आरास दर्शन
४ सप्टेंबर गणेश आरास दर्शन
५ सप्टेंबर गणेश आरास व ईद-ए-मिलाद
६ सप्टेंबर गणेश विसर्जन मिरवणूक
नवरात्री
३० सप्टेंबर दुर्गाष्टमी (नवरात्री)
१ ऑक्टोबर महानवमी व सरस्वती विसर्जन
२ ऑक्टोबर दसरा
६ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा
२१ ऑक्टोबर दिवाळी
२५ डिसेंबर ख्रिसमस
३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत




