नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील काठे गल्ली परिसरात (Kathe Galli Area) असणाऱ्या सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी (Nashik Police) १५ दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे नाशिक पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आज (बुधवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली.
तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजता याठिकाणी आलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर (Police) तुफान दगडफेक केली.
यामध्ये चार अधिकारी आणि २३ पोलिस जखमी झाले असून, त्यांच्या हात-पायाला जखमा झाल्या आहेत. तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. यानंतर आज सकाळपासून येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच काठेगल्ली या भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे.
दरम्यान, सातपीर दर्ग्याचे (Satpir Dargah) अनधिकृत बांधकाम ९० टक्के हटवण्यात आले आहे. आता केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा उरलेला काही भाग बुलझोडरच्या सहाय्याने हटविला जात आहे. सध्या काठेगल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
जमावावर गुन्हा दाखल
सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यावेळी दंगल घडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ५७ दुचाकी इंटरसेप्ट करण्यात आले आहेत. तसेच २३ पाेलीस जखमी झाले असून, पाेलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर दर्ग्याचे बांधकाम पूर्णत: निष्कासित करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.