नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थाच्या (Simhastha Mela) पार्श्वभूमीवर शहराबाहेरील नाशिक परिक्रमा मार्ग विकसित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनीचे (Land) संपादन व मोजणीबाबत कार्यवाहीला नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. या मार्गाचे काम कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) कुंभमेळा विकास प्राधिकरणाची आज सकाळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणामार्फत विविध विकासकामांना गती देण्यात आली असून नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ५ हजार ६५८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन करुन कामांना सुरुवात करण्यात आले आहे. त्याचबरोबर विमानतळ विस्तारीकरण, रस्ते व इतर कामांना प्रशासकीय मान्यताही प्रदान केली असून या कामांची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता नाशिक परिक्रमा मार्ग विकसित करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे.
त्यानंतर आज झालेल्या बैठकीत हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (ओझर) येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधकाम करण्यासह अनुषंगिक कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करणे, नाशिक परिक्रमा मार्गाकरीता आवश्यक जमिनीचे भूसंपादन व मोजणी कार्यवाहीला मान्यता प्रदान करणे, त्र्यंबकेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देणे, सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी बंदोबस्तासाठी व इतर सुविधा पुरविण्यासाठी बाहेरुन येणारे पोलीस कर्मचारी, रेल्वे, एसटी महामंडळ, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेकरीता मंगल कार्यालयांचे अधिग्रहण करणे, प्राधिकरणाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेची जुनी इमारत भाडेतत्वावर घेण्यास मान्यता देणे, लक्ष्मीनारायण मंदिर, नंदिनी एसटीपी, नवश्या गणपती, सोमेश्वर मंदिर, धबधबा येथे घाट बांधण्यास मान्यता देणे, त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्याच्यानिमित्ताने शहरात सुरु होणाऱ्या कामांमुळे वाहतुकीवर येणारा ताण तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दलास मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यासाठी मान्यता देणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, या मान्यतांमुळे सिंहस्थाची कामे अधिक वेगाने सुरु होऊन नाशिकसह जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक सुरळीत होणे, शहराचे सुशोभीकरण, रोजगार वृद्धीबरोबरच येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन वाढीस मदत होणार आहे. त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराला चालना मिळणार आहे.
ठळक मुद्दे
- विमानतळ विस्तारीकरणाचे काम एमएसआयडीसीमार्फत करणे
- पोलीस, रेल्वे, एसटी, आरोग्य व स्वच्छता कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करणे
- त्र्यंबकेश्वर येथे बांधकाम विभागामार्फत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधणे
- जिल्हा परिषदेची जुनी इमारत कुंभमेळा प्राधिकरणास भाडेतत्वावर घेणे
- शहरातील वाहतूक नियत्रंणासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करणे
- लक्ष्मीनारायण मंदिर, नंदिनी एसटीपी, नवश्या गणपती, सोमेश्वर मंदिर व धबधबा येथे घाट बांधण्यास मान्यता.




