त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) कामांना सुरुवात करण्याच्या दृष्टीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून त्र्यंबकेश्वर येथे यात्रेकरू, भाविकांसाठी शासनाकडून उभारण्यात येणारा कॉरिडॉर दर्शन पथ, कुशावर्त तीर्थ येथे साधू-संतांची होणारी गर्दी, त्र्यंबक ते प्रयागतीर्थ या मार्गात घाट उभारणी करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दीड तास पाहणी केली. यात राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सौरभ राव (ज्योतिर्लिंग सचिव), एकनाथ डवले, विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त शेखरसिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा (Officers) सहभाग होता.
नाशिक-त्र्यंबकरोडने (Nashik-Trimbakeshwar Road) पाहणी करत अधिकाऱ्यांनी कुशावर्त तीर्थ येथे भेट दिली. मेनरोड (गंगा स्लॅब लगत) लक्ष्मीनारायण चौक त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजा, अहिल्या-गोदावरी संगम घाट आदी ठिकाणी अधिकाऱ्यांनी दौरा केला. यात प्रमुख अमृतस्नान मार्गाची अवस्था, अतिक्रमणे यांचे निरक्षण करण्यात आले. पुढे रिंगरोडने स्मशानभूमी पुलावरून पायी उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती, नगरपालिका वाहनतळ या ठिकाणी त्यांनी भेट दिली. त्र्यंबकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गादरम्यान भाविक कॉरिडॉर होणार आहे.
दरम्यान, यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, देवस्थानचे विश्वस्त कै लास घुले, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव तसेच कुंभमेळ्याशी संबंधित अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
नगरपालिका सभागृहात बैठक
पाहणी दौऱ्यानंतर नगरपालिका सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मार्च २०२७पूर्वी सिंहस्थ कामे पूर्ण करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. तसेच साधूंच्या मिखणुका, पर्वणी कुठून निघते त्याचे नियोजन कसे असते यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानही या नियोजनात शासनाला मदत करेल, असे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी नमूद करण्यात आले. बैठक यशस्वीतेसाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




