इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik Highway) जुन्या कसारा घाटात (Old Kasara Ghat) ‘द बर्निंग कारचा’ थरार झाल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. आज मंगळवार (दि.१७) रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
जुना कसारा घाटातून ओमनी कार (Omini Car) चढून येत असताना टोप बारव जवळ तिने अचानक पेट (Fire) घेतला. कारच्या इंजिनमधून अचानक धूर आणि नंतर आगीचा भडका दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत तात्काळ सर्व प्रवाशांना (Passengers) बाहेर उतरवले. या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ओमनी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग सुरक्षा पोलीस (Police) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जुना कसारा घाटातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. तर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने त्वरित प्रतिसाद देत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याने संपूर्ण आग आटोक्यात आली. मात्र, यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.




