लासलगाव | हारून शेख | Lasalgaon
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) सोमवारपासून उन्हाळ व लाल कांदा दरात घसरण सुरूच असून गेल्या तीन दिवसात उन्हाळ कांदा कमाल दरात ८३० रु.. सरासरी ५०० रु. तर लाल कांदा कमाल ४३० रु., सरासरी ४५० रुपयांची क्विंटलमागे घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा (Onion) उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच गुरुवार (दि.१३) पासून तीन दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
कांदा दर घसरणीच्या ज्वलंत प्रश्नाबाबात राज्य व केंद्र शासनाने (State and Central Government) उदासिन भूमिका घेतलेली दिसत आहे. कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणार नसल्याने आता कुणाकडे न्याय मागायचा, अशी चर्चा लासलगाव कांदा बाजार आवारात कांदा उत्पादकांमध्ये आहे. होळी सणानिमित्त कामगार (मजूर) वर्ग कामकाजात सहभागी होणार नसल्याने गुरुवार (दि.१३) ते शनिवार (दि. १५) असे तीन दिवस लासलगाव मुख्य बाजार आवारावर कांदा लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समिती सूत्रांनी जाहीर केले.
लासलगाव बाजार समिती आवारात गेल्या शनिवारी उन्हाळ कांदा किमान ८०० रु., कमाल २१५१ रु. तर सरासरी १९०० रु. तसेच लाल कांदा किमान ७०० रु., कमाल २५२५ रु. तर सरासरी १९५० रुपये क्विंटल दराने विक्री झाला होता. सोमवारी कांदा दरात ४०० ते ५५० रुपये क्विंटलमागे घसरण झाल्याने विविध शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले होते. लासलगाव आवारावर शनिवारी विक्री झालेल्या कांदा दराच्या तुलनेत तीन दिवसात लाल कांदा कमाल ८३० रु.सरासरी ५०० रुपयांनी तर उन्हाळ कांदा किमान ४५० रु. तर सरासरी ४३० रुपयांनी कोसळला. होळी सणानिमित्त (Occasion of Holi Festival) तीन दिवस कांदा लिलाव (Auction) बंद राहणार असून सोमवार (दि.१७) पासून पूर्ववत सुरु होणार आहे.
उन्हाळ कांदा
वार | किमान | कमाल | सरासरी |
शनिवार | ८०० | २१५१ | १९०० |
सोमवार | १००० | २२०१ | १८०० |
मंगळवार | ८०० | १९५१ | १६५० |
बुधवार | ८०० | १७०८ | १४७० |
लाल कांदा
वार | किमान | कमाल | सरासरी |
शनिवार | ७०० | २५२५ | १९५० |
सोमवार | ७०० | २००५ | १७०० |
मंगळवार | ७०० | १८७१ | १६२५ |
बुधवार | ७०० | १६९५ | १४५० |