लासलगाव | हारून शेख | Lasalgaon
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बाजार समित्या मध्ये गेल्या आठवडा पासून उन्हाळ कांद्याची (Onion) आवक अंशत: प्रमाणात सुरू झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक या कारणामुळे कांदा दरांमध्ये येथील बाजार समितीत सुरवातीला तीन दिवस चढ तर बुधवार नंतर तीन दिवस उतार पाहायला मिळाला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल कांद्याबरोबर (Red Onion) उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. सोमवार दि.१७ रोजी लाल कांद्याला किमान १२०० कमाल ३३११ तर सरासरी २७०० रुपये दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला किमान १६०० कमाल ३०४६ तर सरासरी २६०० रुपये दर होते. मंगळवारी लाल कांद्याला किमान १००० रुपये कमाल ३४०१ सरासरी २६०० तर उन्हाळ कांद्याला किमान ८०० कमाल ३१५२ सरासरी २७०० बुधवारी लाल कांदा किमान १००० कमाल ३०५३ सरासरी २४०० तर उन्हाळ किमान ९६१ कमाल २७९२ सरासरी २२७० रुपये होते.
गुरुवार पासून भावात घसरण सुरू होऊन ३४०१ वरून कांदा २८७२ होऊन ५७५ रुपये प्रतिक्विंटल मागे घसरला गेल्या आठवडाभराच्या तुलनेत उन्हाळ कांदा किमान दरात४२५ आणि लाल कांदा दरात ६३१ रुपयांची घसरण झाल्याचे आज दिसून आले. काही बाजारपेठांमध्ये दर समाधानकारक असले तरी काही ठिकाणी कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजी आहे. पुढील काही दिवस पुरवठा, मागणी आणि हवामानावर कांद्याच्या दरांचा कल अवलंबून राहणार आहे.
कांदा भावात वाढ होऊन सुधारणा होण्याची शक्यता
20 टक्के निर्यात शुल्काचा मोठा मुद्दा निर्यात वाढवण्यात अडसर ठरत आहे त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय जर झाला तर कांदा भावात वाढ होऊन सुधारणा होण्याची शक्यता आहे. राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने वाढून ५.३४ लाख हेक्टरवर गेली आहे. रब्बी हंगामात १०६ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त ३१ लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे यंदाही दरात मोठी पडझड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज सोमवार दि.२४ रोजी ९८३ वाहनातून १९०६७ क्विंटल कांद्याची आवक झाली.
लाल कांदा किमान १००० रुपये कमाल २६८० रुपये तर सरासरी भाव २४०० रुपये होता. उन्हाळ कांदा किमान १००१ रुपये कमाल २६२६ रुपये तर सरासरी भाव २३५१ रुपये होते. गत सप्ताहात लासलगाव बाजार समिती च्या आवारात लाल कांदा आवक १लाख ०९ हजार ८८० क्विंटल झाली तर उन्हाळ कांदा आवक ३४२१ क्विंटल झाली. असल्याची माहिती बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.