नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये आज प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या सत्र क्र. ११७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यरांची उपस्थिती होती.
पोलीस उपनिरीक्षक झालेल्या महिला आणि पुरुष अधिकाऱ्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडयासह खानदेशातील प्रशिक्षणार्थींचा मोठा सहभाग दिसून आला. अनेक अधिकाऱ्यांचे नातलग अशिक्षित आणि ग्रामीण भागातील होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करून नातलगांना भेटण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांनी मुख्य कवायत मैदानावर मोठी गर्दी केली होती.
यावेळी कुणी आपल्या आई वडिलांसोबत आनंद साजरा केला तर कुणी पती पत्नीसोबत. येथे आलेल्या प्रत्येकासाठी मोठे कुतूहल होते. कुटुंबातला व्यक्ती अधिकारी झाला. त्याच्या खांद्यांवर असलेले स्टार कुणी बघत होते.
तर कुणी हातातील बंदूक घेऊन ऐटीत फोटो सेशन करत होते. कुणी आईच्या तर कुणी पत्नीच्या डोक्यात टोपी घालून आनंद साजरा केला. गेल्या अनेक महिन्यापासून प्रशिक्षण घेत असलेल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबातील प्रत्येकालाच मिठी मारत आनंदाश्रू डोळ्यातून काढत आनंद साजरा केला.