नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर (Rickshaw Driver) कायदेशीर कारवाई सुरु असतानाच आता गल्लीबोळांत किंवा शहरातील कोणत्याही भागात बेशिस्त वाहतूक करणारे रिक्षाचालक रडारवर आले आहेत. अशा बेशिस्त चालकांचे फोटो किंवा व्हिडिओ करुन व्हॉटस्अॅप हेल्पलाइनवर पाठविण्याचे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले आहे. हेल्पलाइनवर तक्रार येताच संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांसह वाहतूक युनिट्सला पोलीस उपायुक्तांनी सूचित केले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार, शहर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी सातही वाहतूक पथकांना कारवाईच्या (Action) सूचना केल्या होत्या. त्यानुसार महिन्याभरात साडेआठशेपेक्षा जास्त रिक्षाचालक व मालकांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्यामुळे शहरात रिक्षा चालवितानाचा गणवेश आणि बॅच लावण्यासाठी चालकांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, रिक्षा चालकांच्या वेशात फिरणाऱ्या गुन्हेगारी (Criminal) प्रवृत्तीच्या व्यक्तिंचा शोध घेण्यात येत असून रिक्षा चालकाने त्याचे नाव, परवाना धारकाचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा परवाना क्रमांक रिक्षेच्या आतील दर्शनी भागात लावाव्यात अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवितांना आढळल्यास रिक्षा परवाना निलंबित होईल, असा इशारा देत धोकादायकरित्या व ओव्हर स्पीड स्वरुपात रिक्षा चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
नाशिककरांनो, फोटो पाठवा…
जर जास्त भाडे आकारले जात असेल, गैरवर्तन केले जात असेल, गणवेशात नसलेले ऑटोचालक किंवा फिकट, नसलेल्या, छेडछाड केलेल्या नंबर प्लेट असलेल्या भंगार किंवा अन्य अवस्थेतील रिक्षा आढळल्या तर एक व्हिडिओ रेकॉर्ड करा. त्या व्हिडिओ किंवा फोटोची आयुक्तालयामार्फत पडताळणी होईल. त्यासंदर्भात त्वरित कारवाई करून नागरिकांना अपडेट देण्यात येईल. या कारवाईत नागरिकांची ओळख गुप्त ठेवली जाईल. त्यामुळे अशा रिक्षांचे फोटो किंवा व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिक्षाचालकांची बेशिस्ती रोखण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. बेशिस्त रिक्षाचालक, नियमभंग करणारे चालक, गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. नागरिकांनी रिक्षाचालकांसंदर्भात व्हॉटसअॅप हेल्पलाइनवर तक्रारी नोंदवाव्यात.
किरिथिका सी. एम., पोलीस उपायुक्त, वाहतूक, नाशिक
ठळक मुद्दे
- व्हॉटसअॅप हेल्पलाइन : ९९२३३२३३११
- महिन्याभरात ८६० रिक्षाचालक व मालकांवर कारवाई
- भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८५ नुसार २४२ गुन्हे नोंद
- मोटार वाहन कायद्यान्वये ८१७ जणांवर कारवाई
- १६ स्क्रॅप रिक्षा जप्त
- एकूण ९०२ रिक्षाचालकांना इ चलान
- एकूण पाच लाख, ८२ हजारांची दंड आकारणी





