ओझे | वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील आळंदी डॅम येथील एक गरोदर महिला उमराळे बुद्रुक बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी आली असता प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन ते तीन तास उभे राहून चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागातील आळंदी डॅम येथील २४ वर्षीय महिला आठ महिन्याची गरोदर होती. ती बँक ऑफ महाराष्ट्र येथे पैसे काढण्यासाठी आली असता बँकेत प्रचंड गर्दी असल्यामुळे दोन ते तीन तास उभे राहिल्यामुळे अचानक चक्कर आली. तिचे मामा संतोष दामू गांगोडे यांनी उमराळे बुद्रुक प्राथमिक केंद्रामध्ये तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. तेथून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे उमराळे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बँकेमध्ये पाच सहा वर्षापासून बँक कर्मचारी कमी असून येथे मोठ्या प्रमाणात खातेदार पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. यामुळे खातेदारांना तास न तास उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी दिंडोरी पंचायत समिती सभापती वसंत थेटे, विठ्ठलराव आपसुंदे, सरपंच भोये, संजय सोनवणे, शशी भाऊ गामने, यांनी केली आहे.
दरम्यान, बँकेत लाडकी बहिणीचे पैसे काढण्यासाठी व केवायसी करण्यासाठी झालेला विलंब व या कारणाने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने आम्हाला बँकेकडून भरपाई द्यावी अशी मागणी भास्कर बोके, मुरलीधर बोके, हरिदास लिलके, (सरपंच )मोतीराम बोके, यांनी बँकेकडे केले आहे.
संबंधित बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सतत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे येथील बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ही बँक ४० ते ५० गावांना जोडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे येथे खातेदारांना तास न तास गर्दीत उभे राहावे लागते, त्यामुळे आशी घटना घडल्यास त्याला बँक जबाबदार राहील असे दिंडोरी पंचायत समितीचे सभापती वसंत थेटे यांनी म्हंटले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खातेदाराची होणारी गर्दी टाळण्यासाठी स्वतंत्र विभाग करणार तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचे बँकेचे मॅनेजर समीर होरा यांनी सांगितले
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा