नाशिक | Nashik
आज (मंगळवारी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक (Cabinet Meeting) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित होते. यावेळी चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत ५ हजार ५०३ कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याचा देखील समावेश आहे.
सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbh Mela) अगदी तोंडावर आल्यामुळे गती द्यावी, या दृष्टीने प्रशासनाने सातत्याने विविध विकासकामांचे आराखडे तयार करून शासनाला सादर केले आहे. मध्यंतरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी सुचवलेल्या विषयांनुरुप नवा आराखडा तयार करून सादर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरमधील चौंडी येथे पार पडलेल्या बैठकीत त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) करावयाच्या विकासकामांसाठीच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरसाठी प्रत्यक्षात ११०० कोटी रुपयांचा आराखडा (Plan) तयार करण्यात आला होता. मात्र, प्रधान सचिवांच्या बैठकीमध्ये त्यातील काही विकासकामांना तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ३०० कोटी रुपयांची विकासकामे तीर्थक्षेत्र विकासकामांमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने शहरातील अतिक्रमण, पार्किंग, पूजा साहित्य विकणाऱ्यांचे पुनर्वसन, नवीन रस्ते, कुंडांची उभारणी, दर्शन मार्गाचा विकास, मंदिरांचा विकास, मंदिरांची डागडुजी, काही ठिकाणी मंदिरांचे नूतनीकरण या कामांना समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांसाठी ३०० कोटी पैकी २७५ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली.