नाशिक | प्रतिनिधी | Nashik
काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे (District Bank) प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी आपल्या पदाचा ईमेलद्वारे राजीनामा वरिष्ठांकडे पाठवविला होता. त्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर अखेर नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकपदी संतोष बिडवई (Santosh Bidwai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेचा एनपीए (NPA) वाढल्याने कर्ज वसुलीही अपेक्षित होत नाही. त्यामुळे जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतापसिंह चव्हाण यांची प्रशासक म्हणून २० फेब्रुवारी २०२२ रोजी नियुक्ती केली होती. नियुक्तीनंतर त्यांनी वसुलीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात २३५ कोटी रुपयांची वसुली झाली.
तसेच चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्याबाबत (Worker) मात्र काही कठोर निर्णय घेतले. त्यामध्ये वेतन कपातीसारखा व शिस्तीच्या भागाचा समावेश होता. सक्तीच्या कर्ज वसुलीबाबत शेतकरी संघटनांचा चव्हाण यांच्या भूमिकेला तीव्र विरोध होता. त्यामुळे चव्हाण यांनी प्रशासकपदाचा (Administrator) राजीनामाही दिला होता.
दरम्यान, चव्हाण यांच्या पूर्वी प्रशासक म्हणून अरुण कदम यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी कर्ज वसुली बाबत कठोर निर्णय घेतल्याने त्यांच्या कार्यकाळात वसुलीचे प्रमाण ३० टक्के इतके होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारीनंतर प्रशासक पदावरून त्यांना दूर करण्यात आले होते. यानंतर चव्हाण यांची जिल्हा बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांच्याजागी जिल्हा बँकेच्या प्रशासकपदी संतोष बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.